ठाणे: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं भारतासह अनेक देशांची झोप उडवली आहे. डेल्टा पेक्षाही अधिक वेगानं पसरणारा हा व्हेरिएंट आहे. कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रातही दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रातही भीतीचं सावट आहे.
14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान जवळपास 7 जण साऊथ आफ्रिकेतून ठणायत आल्याची माहिती मिळाली आहे. ठाणे पालिका आयुक शर्मा यांनी ही माहिती दिली. या 7 जणांची शोध मोहीम पालिकेने सुरू केली आहे.
या 7 जणांना कोणती लक्षणे आढळतील त्यांची तपासणी आणि विलगीकरण करण्याचे काम पालिका करणार आहे. डोंबिवलीची घटना ताजी असतानाच ठाण्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रवासी पालिकेला कधीपर्यंत मिळून येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या आणि कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या जिनोम सिक्वेंसींग तपासणीचा अहवाल 7 दिवसांत येणार आहे. त्याच्या कुटुंबातील 6 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दक्षिण आफ्रिकेतून गेल्या 10 नोव्हेंबरपासून सुमारे 1 हजार लोक मुंबईत आल्याची माहिती समोर आली आहे. त्या सगळ्यांचं मुंबई महापालिकेकडून ट्रेसिंग सुरू आहे. अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
शाळा सुरू करण्याबाबत अजून पुनर्विचार झालेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ओमायक्रॉन उपाययोजनांबाबत आदित्य ठाकरेंनी महापालिका आयुक्त चहल यांच्याशी चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोरोनामुळे सगळ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. अशातच कोरोना होऊन गेला त्यांना ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटपासून धोका असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. म्हणून WHOनं सावधानतेचा इशारा दिला आहे.