मुंबई : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा दावा हवामान खात्यानं केलाय. येत्या २४ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम आणि जोरदार पाऊस होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तर कोकणात जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
दरम्यान, काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा प्रयोग होण्याची शक्यता कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी वर्तवली आहे.
गेल्या चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. वेंगुर्ल्यात सर्वाधिक 1१५४.२ मि.मी पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वेंगुर्ले-शिरोडा बाजारपेठेत पाणी घुसरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. केळुस, आरवली, शिरोडा या भागात बाजारपेठा आणि रस्ते पाण्याखाली गेले होते. वेंगुर्ला-केळुस नदीला पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती.
दडी मारलेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वदूर हजेरी लावत खरीप पिकाला जीवदान दिले आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची चिंता थोडी दूर झालीये. जिल्ह्यातील नांदुरा, शेगाव, मेहकर, चिखली या ठिकाणी चांगला पाऊस झाला. यामुळे पिकं तग धरू शकतील, अशी स्थिती निर्माण झालीये. अधुनमधून असा पाऊस झाल्यास जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार असून दुबार पेरणीचं संकटही टळण्याची आशा उत्पन्न झाली आहे.
जालना जिल्ह्यातही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. जालना शहरासह बदनापूर, भोकरदन, जाफराबाद या तालुक्यांत चांगला पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून खरीप पिकांनाही याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरसरीच्या २० टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूरमध्ये पाऊस झाला. सुरुवातीला एक दोन वेळा तुरळक पाऊस पडल्यानंतर सोलापुरातून पाऊस गायब झाला होता. जुलै संपत आला तरी पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होते. शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे सोलापुरात अल्हाददायक गारवा निर्माण झाला.
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर मालेगाव तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केलंय. निमगाव, येसगाव, चंदनपुरी, मुंगसे, सौंदाणे, सायने बुद्रुक, चाळीसगाव फाटा या परिसरात शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र पावसाच्या पुनरागमनामुळे खरिपांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.