मुंबई : शिवसेना-भाजप युतीमध्ये कुरघोडीचं राजकारण दिसून येत असलं तरी अलीकडच्या काळात भाजप नेत्यांच्या 'मातोश्री'वर नियमित वाऱ्या होताहेत.
शिवसेनेने NDA चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केल्यानं भाजप नेत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय. पाठिंबा मिळण्यासाठी स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी 'मातोश्री' वारी केली. या पाठिंब्यामुळे दोन पक्षांमधला तणाव किंचित निवळलाय.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांची आज पुन्हा 'मातोश्री' वारी आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुनगंटीवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वृक्षारोपण कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं.
तर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील सायंकाळी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी शेतकऱ्यांना कर्जंमाफी निकष आणि अंमलबजावणीवर पुन्हा चर्चा करणार आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांचं पूर्ण समाधान झालं नव्हतं. त्यामुळे आज होणाऱ्या चर्चेत नेमकं काय घडतं याकडे सर्वांचे लक्ष असेल.