मुंबई : दहीहंडी फोडताना गोविंदा पथकांनी नेमके किती थर लावावेत, याबाबत यंदा कोणतेही निर्बंध असणार नाही आहेत. त्यामुळं दहीहंडी आयोजक आणि गोविंदा पथकांना मोकळं रान मिळालं आहे. परिणामी उंचच उंच थर लावण्याची स्पर्धा यंदाच्या वर्षी पुन्हा पाहायला मिळणार आहे.
यंदाच्या वर्षी उंचच उंच हंड्यांचा थरार रंगण्याची चिन्हं आहेत. गेल्यावर्षी न्यायालयाच्या आदेशामुळं हंड्यांच्या उंचीवर आणि बालगोविंदांच्या सहभागावर निर्बंध घालण्यात आले होते. गोविंदांचं वय 14 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि गोविंदांनी आवश्यक सुरक्षा नियम पाळावेत, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालायनं यंदाही दिल्या. मात्र हंड्यांच्या उंचीबाबतचा निर्णय विधिमंडळानं घ्यावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. पण ना विधिमंडळानं त्याबाबत निर्णय घेतला, ना सरकारनं... त्यामुळं विक्रमी थर रचण्यासाठी नवी स्पर्धा रंगणार आहे. 9 थरांचा विश्वविक्रम मोडून 10 थर रचण्याची भाषा सुरू झाली आहे.
सरकारनं यंदा दहीहंडी नियमांचा काला का केला, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. न्यायालयानं सूचना करूनही विधिमंडळानं त्याबाबत स्पष्ट भूमिका का घेतली नाही, असा सवाल केला जातो आहे.
एकीकडं आयोजकांनी बक्षिसांची आमिषं वाढवली आहेत. तर दुसरीकडं उंच थर रचण्याच्या नादात कोणताही धोका पत्करणार नाही, अशी सावध भूमिक गोविंदा पथकांनी घेतली आहे.
गेली दोन वर्षं कोर्ट कचे-यांमुळं दहीहंडी गाजली. यंदाचं वर्ष त्याला अपवाद ठरलंय. त्यातच सरकारनं उंचीबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं आपल्या सुरक्षेची खबरदारी आता गोविंदांनीच घ्यावी लागणार आहे.
पाहा व्हिडिओ