दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : फेब्रुवारी २०१८ मध्ये होणाऱ्या १० आणि १२ वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आधारकार्ड क्रमांक नमूद करणे अनिवार्य केलेले असले तरीही आधारकार्ड नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांस अर्ज भरण्यास अनुमती नाकारता येणार नाही.
तसेच आधारकार्ड नसल्यास निकालही मिळणार नाही, असे कोणतेही आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
१० वी १२ वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे करण्याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाले, यावर भूमिका स्पष्ट करताना मंडळाचे सचिव श्री. कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले की, १० वी आणि १२ वीच्या परीक्षेचा अर्ज भरताना आधारकार्ड क्रमांक सक्तीचे केल्याबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.
परंतू सर्व स्तरावर आधारक्रमांक आवश्यक असल्यामुळे तसेच इ. १० वी आणि १२ वीच्या शिक्षणानंतर शासन स्तरावरील पुढील विविध योजना, शिष्यवृत्तीसाठी आधारक्रमांक आवश्यक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधारक्रमांकाची नोंद अर्जामध्ये असावी एवढेच सुचीत करण्यात आले आहे.
अर्ज भरताना आधारकार्ड आवश्यक असले तरीही एखाद्या विद्यार्थ्याकडे आधारकार्डची नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक ग्राह्य धरण्यात येईल.
जर विद्यार्थ्याने नोंदणी केलेली नसेल तर निकालापर्यंत आधारकार्ड काढण्यात येईल असे हमीपत्र विद्यार्थ्याने प्राचार्य/मुख्यापकांना देणे आवश्यक आहे. परंतू आधारकार्ड क्रमांक नाही म्हणून परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही, असा कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही असेही पाटील यांनी स्पष्ट केले.