नितीन देसाईंना न्याय कधी? 24 दिवस उलटले, वसुली गँगवर अजूनही कारवाई नाही

Nitin Desai Suicide : ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी त्यांच्या एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. त्या घटनेला आज 24 दिवस उलटलेत. मात्र त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणा-या एडलवाईझ कंपनीच्या अधिकाऱ्यांची साधी पोलीस चौकशीही झालेली नाही.

Updated: Aug 26, 2023, 02:25 PM IST
नितीन देसाईंना न्याय कधी? 24 दिवस उलटले, वसुली गँगवर अजूनही कारवाई नाही title=

Nitin Desai Suicide : 2 ऑगस्ट 2023. ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी त्यांच्या एनडी स्टुडिओत (ND Studio) गळफास लावून आत्महत्या केली.  नितीन देसाई (Nitin Desai) काळाच्या पडद्याआड गेले. त्यांची आठवण आता कुणालाही येत नाही. मात्र झी मीडिया अजून त्यांना विसरलेला नाही. एडलवाईझ कंपनीच्या (Edelweiss Group) वसुली गँगवर अजून कारवाई झाली नसल्याचा आरोप देसाईंच्या कुटुंबियांनी केलाय. कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांवर एफआयआर (FIR) दाखल होऊनही अजून त्यांना साधी अटक झालेली नाही. एफआयआरमध्ये कुणाची नावं आहेत, पाहूया

आरोपी नंबर 1
एडलवाईजचे चेअरमन
रशेष शाह

आरोपी नंबर 2
एडलवाईजचे अधिकारी
स्मित शाह

आरोपी नंबर 3
एडलवाईजचे अधिकारी
केयूर मेहता

आरोपी नंबर 4
EARCचे अधिकारी
आर. के. बन्सल

आरोपी नंबर 5
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाचे अधिकारी
जितेंद्र कोठारी

या अधिका-यांनी कर्जवसुलीसाठी एवढा त्रास दिला की, नितीन देसाईंना आत्महत्या करावी लागली, असा आरोप कुटुंबियांनी केलाय.. याप्रकरणी रायगड पोलिसांनी (Raigad Police) दाखल केलेल्या एफआयआरमध्ये एडलवाईजच्या वसुली गँगच्या मोडस ऑपरेंडीचा सविस्तर खुलास करण्यात आलाय...

एडलवाईझ वसुली गँगवर आरोप 
कर्जतमध्ये एनडी स्टुडिओवर कब्जा करण्यासाठी नितीन देसाईंचा मानसिक छळ करण्यात आला. एडलवाईज अधिकाऱ्यांनी देसाईंवर दबाव टाकला, त्यामुळं ते मानसिक तणावात होते. नितीन देसाई सर्व कर्ज फेडायला तयार होते. मात्र तातडीनं कर्ज फेडण्यासाठी एडलवाईझ अधिकाऱ्यांनी दबाव टाकला, असा आरोप देसाई कुटुंबियांनी केलाय. एडलवाईजच्या अधिकाऱ्यांनी कसा छळ केला, हे सांगताना देसाईंचे काका श्रीकांत देसाई यांना रडू कोसळलं. या सगळ्या एडलवाईजच्या अधिकाऱ्यांना अटक करून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी श्रीकांत देसाईंनी केलीय.

या अधिका-यांविरुद्ध पुरावे आहेत, साक्षीदार आहेत, तरीही पोलिसांचा तपास कासव गतीनं सुरू आहे. आतापर्यंत 20 हून अधिक लोकांची चौकशी पोलिसांनी केली. देसाईंच्या ऑडिओ क्लिप जप्त केल्या. मात्र ज्यांची एफआयआरमध्ये नावं आहेत, त्यांच्यावर अजून काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळं पोलीस तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय... 

पोलिसांना सवाल 
आत्महत्येपूर्वी नितीन देसाईंनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिप्स पुरेसा पुरावा नाहीत का? देसाईंच्या पत्नीनं FIRमध्ये केलेले आरोप एडलवाईजवर कारवाईसाठी पुरेसे नाहीत का? FIR, साक्षीदार, पुरावे असतानाही आरोपींची चौकशी करण्याची गरज का वाटली नाही? असे सवाल केले जातायत.

गुन्हेगारांवर कारवाई कधी?
गेल्या 8 ऑगस्टला एडलवाईज कंपनीनं FIR रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र 11 ऑगस्टला मुंबई हायकोर्टानं आरोपींच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला. याचाच अर्थ पोलिसांना आरोपींवर कारवाई करण्यासाठी कोर्टानं मनाई केलेली नाही. मात्र तरीही साधी चौकशी होत नाही, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. देसाई कुटुंबाला न्याय मिळायला हवा, वसुली गँगवर कारवाई व्हायला हवी. जेणेकरून आणखी कुणी नितीन देसाई यांची शिकार बनता कामा नये.