'तुम्ही गँगवार सुरू केलाय...आता तांडव होणार; सोमय्यांवर हल्ल्यानंतर भाजपही प्रचंड आक्रमक

आता आम्ही दगडाचे उत्तर दगडाने देऊ. आम्हाला जीवे मारण्यापर्यत यांची मजल गेलीय. यांनी अघोषित गँगवार सुरू केलंय. त्यामुळे आता तांडव होणार'. असा गंभीर इशारा भाजपनेते नितेश राणे यांनी दिला. ते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलत होते.

Updated: Apr 24, 2022, 12:09 PM IST
'तुम्ही गँगवार सुरू केलाय...आता तांडव होणार; सोमय्यांवर हल्ल्यानंतर भाजपही प्रचंड आक्रमक title=

मुंबई : 'किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. आता आम्ही दगडाची भाषा दगडाने करू. आम्हाला जीवे मारण्यापर्यत यांची मजल गेलीय. यांनी अघोषित गँगवार सुरू केलंय. त्यामुळे आता तांडव होणार'. असा गंभीर इशारा भाजपनेते नितेश राणे यांनी दिला. ते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलत होते.

'बाळासाहेबांचे शिवसैनिक असे पोलिसांच्या मागे लपून हल्ले करीत नव्हते. ही नवीन XXर्दांची शिवसेना आहे. फक्त 24 तास पोलिसांना दिलीप वळसे पाटील यांनी सुटी द्यावी. आम्ही त्यांना जशास तसं उत्तर देऊ ना... आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू... दगडाची भाषा दगडाने करू... सरकारी पक्षाचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक रस्त्यावर पोलिसांच्या संरक्षणात धिंगाना करीत असतील तर, राज्याच्या जनतेने कायदा सुव्यवस्थेबाबत कोणाकडे दाद मागावी.' असा संतप्त सवाल राणे यांनी केला.

काल जमावबंदी का लावली नाही?

'काल मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक रस्त्यावर धिंगाणा घालत होता. अन्यवेळी तुम्ही मुंबईत सणासुदीला कलम 144 लावता. काल का नाही लावले हे कलम? 
मुंबईच्या आयुक्तांना माझं विचारणं आहे की, काल का तुम्ही जमावबंदी लावली नाही? लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी का घेऊ शकला नाही. तुम्हाला शिवसेनेच्या पे रोलवर ठेवले आहे का. तसं असेल तर सांगून टाका. आम्ही पोलिसांकडून अपेक्षा ठेवणं बंद करू.' अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

तुम्ही गँगवार सुरू केला... त्याच भाषेत उत्तर

'माझ्यावर हल्ले झाले, मोहित कंबोझवर हल्ले झाले काल किरीट सोमय्यांवर हल्ले झाले. राजकीय लढाई व्यासपीठावर लढायची असते. तुम्ही अघोषित गँगवार सुरू केला आहे. यावर आम्ही काय बघत बसणार नाही. फक्त निषेध करणार नाही. आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ.. असंही राणे यांनी म्हटलं.

'पोलिसांनीपण विचार करावं, उद्धव ठाकरेंच्या मालकीचं राज्य नाहीये. कधीतरी ती खुर्ची जाणार. उद्धव ठाकरेंचा सरकारी भाचा (वरुण सरदेसाई)ला खूप लोकांच्या घरावर मोर्चे काढायची हौस आहे. एवढा तू मर्द असशील तर तुझ्या घऱासमोरचं पोलीस प्रोटेक्शन काढ. कशाला 5 - 5 पोलीस सोबत घेऊन फिरतो? सरदेसाईचं रक्त सळसळत असेल तर त्याने पोलीस संरक्षणातून बाहेर यावं. हा असा धिंगाणा घालतोय, जसं काही याच्या बापाची मुंबई आहे.' अशी टीका राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर केली.

तांडव होणार...

'आम्हाला जीवे मारण्यापर्यंतची परिस्थिती येत असेल तर, आमच्याकडूनही त्याच प्रमाणे प्रतिक्रिया येणार... 'तांडव होणार'...मग तांडव झाल्यावर काय केसेस टाकायच्या त्या टाका.. 

आता रस्त्यावरची लढाई सुरू झालीये.. तुम्ही कॉंक्रीटची विट किरीट सोमय्यांच्या अंगावर टाकता. तोपर्यंत पोलीस काय करीत होते. उद्या शिवसेनेच्या नेत्यावर विटा पडल्या तर, पोलीस काय भूमिका घेणार आहेत'. असा सडकून सवालही त्यांनी पोलिसांना केला.

'राणेंचं घर कधी पाडणार, सोमय्यांवर कधी केसेस टाकणार, दरेकरांना कसे अटकवणार एवढंच काम मुख्यमंत्री करीत आहेत. राज्यात सर्वच प्रश्न संपलेत वाटतं. राज्याचं दरडोई उत्पन्न अमेरिकेहून अधिक झालं असावं, शेती, विजेचे प्रश्न संपले असावे. म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांना फावला वेळ एवढा आहे की, या गोष्टींकडे लक्ष देत आहेत.' अशी टीका देखील राणे यांनी केली.