मुंबईत NIAकडून डी कंपनीची कोंडी, छोटा शकीलच्या साडूसह तीन जण ताब्यात

NIA कडून दाऊदशी संबंधित असणाऱ्या 20 ठिकाणांवर छापा

Updated: May 9, 2022, 03:00 PM IST
मुंबईत NIAकडून डी कंपनीची कोंडी, छोटा शकीलच्या साडूसह तीन जण ताब्यात title=

मुंबई : एनआयएने मुंबईत डी कंपनीची कोंडी करायला सुरूवात केली आहे. एनआयएने सकाळपासूनच डी कंपनीशी संबंधितांवर छापे मारले. विशेष म्हणजे छापे मारलेल्यांपैकी बहुतांश जण हे मंत्री नवाब मलिकांशीही संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारीतून नवाब मलिक यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं आहे. 

एनआयएने छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट याला ताब्यात घेतलं आहे. तर माहिममधून सुहेल खंडवानी आणि कय्यूम नावाच्या व्यावसायिकाला ताब्यात घेतलंय. सुहेल खंडवानीचे नवाब मलिकांचा मुलगा फराझ मलिकशी संबंध असल्याचा संशय  आहे. 

बांद्रात एनआयने मुनीरा प्लंबर नावाच्या व्यावसायिक महिलेच्या घरावर छापे मारलेत. मुनीरा प्लंबर ही महिला गोवावाला कंपाऊंडच्या मालकांपैकी एक असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मलिकांनी या मुनीरा पारकरचीच प्रॉपर्टी हसीना पारकरच्या माध्यमातून विकत घेतल्याची माहिती आहे. 

NIA ने सुहेल खंडवानी या व्यावसायिकाला माहिम भागातून ताब्यात घेतलं. सुहेल खंडवानी हा टचवूड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक आहे. नवाब मलिकांचा मुलगा फराझ मलिका हाही या कंपनीत 2006 ते 2016 या काळात संचालक होता. टचवूड कंपनी आणि कांडल्याची असोसिएट हायप्रेशर टेक्वॉलॉजी कंपनीने बीकेसी भागात 200 कोटींची जमीन खरेदी केली.

कोण आहे सलीम फ्रूट?
सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा साडू आहे. PMLA ने याआधी सलीम फ्रूटचं स्टेटमेंट देखील नोंदवलं आहे. छोटा शकीलच्या पाकिस्तानच्या घरी सलीम तीन ते चार वेळा गेल्याची देखील माहिती आहे. 2006 मध्ये UAEमधून सलीम फ्रूटची हकालपट्टी करण्यात आलीय. तो छोटा शकीलसाठी खंडणी वसूल करायचा 2006मध्ये त्याला अटक करण्यात आली होती . सलीम फ्रूटवर अनेक गुन्हे दाखल आहेत. इतकेच नव्हे तर सलीमवर मोक्का देखील लावण्यात आला होता. सलीम फ्रूट हा हसीना पारकरचा निकटवर्तीय होता. हसीना पारकर दाऊद इब्राहिमची बहीण होती.