विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

सुनील शिंदे, राजहंस सिंह, सतेज पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल यांचा समावेश  

Updated: Jan 6, 2022, 03:22 PM IST
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ title=

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या विधान परिषदेच्या पाच सदस्यांना आज सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी संसदीय कार्य मंत्री अनिल परब उपस्थित होते.

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेमधून शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह, कोल्हापूरमधून गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि धुळे मतदार संघातून अमरीश पटेल यांची बिनविरोध निवड झाली होती.

नागपूरमधून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे छोटू भोयर यांच्या लढत होणार होती. मात्र, काँग्रेसने ऐनवेळी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपने प्रतिक्षेच्या केलेल्या या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बावनकुळे यांचा विजय झाला.

तर, अकोला वाशीम मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरस होती. या निवडणुकीत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा पराभव करून विजय खेचून आणला. 
 
या विजयी झालेल्या सदस्यांना आज विधानभवनात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. धुळे येथील सदस्य अमरीश पटेल यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते या शपथविधी सोहळयास उपस्थित नव्हते.