Abdul Sattar Controversy : ताईला शिवीगाळ महाराष्ट्र पेटला, दादा मात्र शांत...

Maharashtra Politics राष्ट्रवादीचे नेते आक्रमक असताना विरोधी पक्षनेत्यांच्या मौनामुळे चर्चांना उधाण

Updated: Nov 8, 2022, 03:46 PM IST
Abdul Sattar Controversy : ताईला शिवीगाळ महाराष्ट्र पेटला, दादा मात्र शांत... title=

Maharashtra Politics : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) अपशब्द वापरण्यावरुन राष्ट्रवादी (NCP) आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात  राज्यभर निदर्शनं करण्यात आली. पण दुसरीकडे याच विषयावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र मौन बाळगल्याने चर्चेचा विषय बनलाय. अजित पवारांनी याविषयात साधं ट्विटही केलेलं नाही. त्यांच्या ट्विटर (Tweeter) आणि फेसबूक (Facebook) पेजवर विविध विषयांवर भाष्य करण्यात आलंय. पण सुप्रिया सुळेंवर मात्र कोणतंही विधान नाही. त्यामुळेच अजित पवारांच्या या मौनावर राजकीय क्षेत्रात  उलटसुलट चर्चा सुरु आहे. अजित पवार आजोळच्या कौटुंबिक कार्यक्रमाला गेलेत. अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी ही अपेक्षा व्यक्त करु नका अशी सारवासारव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) केलीय.

अब्दुल सत्तार यांच्या हकालपट्टीची मागणी
सुप्रिया सुळेंना अपशब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीय. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचं एका शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची (Bhagat Singh Koshyari) भेट घेतली. तेव्हा राज्यपालांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. दरम्यान जयंत पाटील यांनी सत्तारांची भूमिका मान्य आहे का असा सवाल देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) विचारलाय. सरकार टिकवण्यासाठी कोणाकोणाचा भार उचलणार असा टोलाही लगावलाय.

राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन
कृषिमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येतंय. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी  करण्यात आली. तर जालन्यात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलकांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचे फोटो जाळले. 

तोडफोडीप्रकरणी गुन्हे दाखल
सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अब्दुल सत्तार यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबईत सत्तारांच्या शासकीय निवासस्थानावर हल्लाबोल केला. या प्रकरणी विद्या चव्हाण, नरेंद्र राणे यांच्यासह 16 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. पन्हाळगड या शासकीय निवासस्थानात बेकायदेशीर जमाव जमवून जबरदस्ती प्रवेश करत तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आलाय.