मुंबई : Nawab Malik Vs Devendra Fadnavis : अंडरवर्ल्डच्या लोकांकडून 30 लाखांत जमीन खरेदी केली गेली आहे. सलीम पटेल, सरदार शहावली खान हे दोघे मुंबई स्फोटातील दोषी आरोपी आहेत. त्यांच्याकडून नवाब मलिक परिवाराच्या सॉलिडस कंपनीकडून ही जमीनची खरेदी झाली आहे. कुर्ला येथील एलबीएस रोडवर तीन एकर जागा आहे. 30 लाखांपैकी 20 लाखांचा व्यवहार झाला. सॉलिडस कंपनी ही नवाब मलिक यांच्या परिवाराची होती. या कंपनीचे डायरेक्टर स्वत: मलिक राहिलेले आहेत. याची चौकशी करण्यात यावी. मी हे सगळे पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सलीम - जावेदची स्टोरीही नाही आणि इंटरव्हलनंतरचा सिनेमाही नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे, असे फडणवीस म्हणाले. सरदार शहावली खान हे 1993 चे गुन्हेगार आहेत. यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असून ते तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात ते फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागागी झाले. बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्यानी केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी ते उपस्थित होते. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानी आरडीएक्स भरले. साक्षीदारांनी याविषयी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
मोहम्मद अली इशाक पटेल तर्था सलीम पटेल. आर. आर. पाटील इफ्तार पार्टीमध्ये गेले होते तेव्हा त्यांची गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यांचा दोष काही नव्हता. पण ज्या दाऊदच्या माणसासोबत म्हणून त्यांचा फोटो व्हायरल झाला, तो हा सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. हसीना पारकरला 2007मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेल यालाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची. सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी करून पैसा गोळा केला जायचा. हा सलीम पटेल जमीन लाटण्याच्या धंद्यातला सर्वात प्रमुख माणूस होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कुर्ल्यामध्ये जवळपास तीन एकर जागा केवळ 30 लाखात घेतली. याचा व्यवहार हा 20 लाखांचा झाला आहे. मात्र, खरेदी केलेल्या जमीनतून महिन्याला 1 कोटी रुपये भाडे घेत आहेत. या जागेला गोवावाला कंपाऊंड असे म्हटले जाते. गोवावाला म्हणून व्यक्ती होते, त्यांची ही जागा होती. कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे. या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये 2019मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
2003मध्ये हा सौदा झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. आता मंत्री झाल्यावर याचा व्यवहार झालेला नाही. मात्र, अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावे लागले होते. पण तुम्हाला माहिती नव्हते की सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्ब स्फोटातील दोषींकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली तीन एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर 'टाडा' लागला होता. 'टाडा'च्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का? असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केलेत.
अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जो व्यवहार झाला आहे. त्याबाबतची मी ही कागदपत्र संबंधित यंत्रणेकडे देणार आहे. हे सगळे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मी देणार आहे. त्यांनाही कळेल, की त्यांच्या मंत्र्यांनी काय करून ठेवले आहे, असे फडणवीस म्हणाले.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले. ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेली एनसीबीच्या कारवाई एक षडयंत्र होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला. यामागे भाजपचा हात होता, असा थेट आरोप मलिक यांनी केला होता. त्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. दिवाळीनंतर मीच मोठा बॉम्ब फोडणार, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून केल्या जाणाऱ्या अनेक कारवाया बोगस आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे खंडणी वसुलीसाठी खोटी प्रकरणे तयार करतात आणि मोठ्या घरातील लोकांना अडकवतात. त्यांना भारतीय जनता पक्षाचे काही लोक सामील आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
या आरोपानंतर गेल्या महिनाभरात मलिक यांनी मीडियाच्या माध्यमातून अनेक पुरावेही सादर केले होते. त्यानंतर एनसीबीने समीर वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला. तसेच नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचेही ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हे आरोप फडणवीस यांनी आधीच फेटाळले होते. उलट नवाब मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, असे सांगत त्यांनी मलिक यांच्या विरोधात पुरावे जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. तर, नवाब मलिक यांनीही फडणवीसांचे आव्हान स्वीकारलं होते.