Navi Mumbai News : हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. याच हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत होते ती म्हणजे सिडको आणि म्हाडासारख्या संस्थांची. नवी मुंबई आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये परवडणाऱ्या दरात आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी घरांच्या शोधात असणाऱ्या अनेकांसाठी हा मोठा मदतीचा हात ठरतो. आता नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सिडको पुन्हा एकदा तारणहार ठरणार आहे. कारण, नव्यानं 3322 सदनिका सिडकोकडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.
सिडको महामंडळातर्फे देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं महागृहनिर्माण योजना जानेवारी 2024 चा शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत तळोजा येथील नवी मुंबई मेट्रो आणि द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू एमटीएचएलच्या (MTHL) पासून अगदी नजीकच्या भागात 3322 घरं विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सिडकोच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार 26 जानेवारी 2024 पासूनच या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात झाली आहे. ज्यानंतर आता या योजनेची सोडत 19 एप्रिल 2024 रोजी काढण्यात येणार आहे.
सिडकोच्या या महागृहनिर्माण योजनेतील 3322 घरांपैकी द्रोणागिरी नोडजवळील 61 आणि तळोजा नोड येथील 251 मिळून 312 घरं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध असतील. तर, द्रोणागिरी येथील 374 आणि तळोजा येथील 2636 मिळून 3010 घरं इतर सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध राहतील.
सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या ऑनलाइन नोंदणी आणि सविस्तर माहितीसाठी https://lottery.cidcoindia.com या संतेकस्थळावर भेट द्या. अर्ज आणि नोंदणीसाठीच्या इतर समस्या आणि शंकांच्या निरसनासाठी 7065454454 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.
सिडकोच्या वतीनं नवी मुंबईमध्ये सर्वांगीण विकास सुरु असतानाच आता मुख्य प्रवाहातील मुंबईशी हा भाग अगदी सहजगत्या जोडला गेल्यामुळं इथं वास्तव्यास पसंती देणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. परिणामी नवी मुंबई आणि नव्यानं दृष्टीक्षेपात असणाऱ्या नैना शहराच्या विकासाच्या दृष्टीनं मेट्रो, रस्ते आणि तत्सम प्रकल्पांची आखणीही सुरु आहे.
सिडकोनं काही दिवसांपूर्वीच नेरुळ- उरण मार्गावरील तारघर रेल्वे स्थानकापासून आंबिवलीपर्यंत आणि कळंबोली- चिखले- कोनपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रोसेवा पुरवली जाऊ शकते का याच्या निरीक्षणासाठी एक समिती तयार केली. ही मेट्रो पनवेल आणि उलवे परिसरासाठी मोठ्या फायद्याची ठरणार असून, नैना शहराच्या विकासात मोठी भूमिका बजावताना दिसणार आहे.