विलासरावांचा तो सल्ला राणेंनी ऐकला असता तर...

अखेर एका तपानंतर नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केला.

Updated: Sep 21, 2017, 10:48 PM IST
विलासरावांचा तो सल्ला राणेंनी ऐकला असता तर... title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : अखेर एका तपानंतर नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासूनच काँग्रेसच्या संस्कृतीशी राणेंना जुळवून घेणे कठीण जात होते. त्यातूनच अनेकदा राणेंनी काँग्रेसमध्ये असतानाच काँग्रेसच्या नेत्यांवर तोफ डागली. राणे आपली पुढील भूमिका दसऱ्याच्या आधी स्पष्ट करणार आहेत. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार राणे भाजपामध्ये जाणार असल्याचे सांगितलं जातंय.

राज्याच्या राजकीय वर्तुळात नेहमीच आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या नारायण राणेंची जुलै 2005 रोजी राजकारणात शिवसेना सोडून पहिला भूकंप घडवला. या भूकंपाचा धक्का तीव्र होता. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे अनेक आमदार, पदाधिकारी काँग्रेसमध्ये आले.

या गोष्टीला 12 वर्ष म्हणजेच एक तप पूर्ण झाल्यानंतर नारायण राणेंनी राजकारणात दुसरा भूकंप घडवला आहे. मात्र या भूकंपाची तीव्रता पहिल्या धक्क्याच्या तुलनेत अगदीच सौम्य आहे.

यावेळी राणेंबरोबर एकही आमदार नाही, मोठे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे राणेंची पुढील राजकीय वाटचाल काहीशी बिकटच असणार आहे. राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा शिवसेनेमध्ये जडणघडण झालेले राणे काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीशी आणि विचारसरणीशी जुळवून घेतील का हा प्रश्न विचारला गेला.

राणेंची काँग्रेसमधील मागील 12 वर्ष बघितली तर राणेंना काँग्रेसशी जुळवून घेता आले नाही किंबहुना राणेंना काँग्रेस समजलीच नाही अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आपल्याला मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन पक्षाने दिले होते, ते पाळले नसल्याचा आरोप राणेंनी यापूर्वी अनेकदा केलाय, तोच आरोप काँग्रेस सोडतानाही राणेंनी केलाय.

नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा ते लपवून ठेवू शकले नाहीत. त्यामुळे हे पद मिळत नसल्याने राणे अनेकदा अस्वस्थ झाले, याच अस्वस्थतेतून त्यांनी 2008 साली पहिल्यांदा काँग्रेसविरोधात मोर्चा उघडला.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर तोफ डागण्यास सुरुवात करून राणेंचा टीकेचा रोख थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यापर्यंत जाऊन पोहचला. यामुळे डिसेंबर 2008 साली पक्षातून सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं.

या कारवाईनंतर मात्र राणे काहीसे शांत झाले आणि त्यांनी काँग्रेसशी जुळवून घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच काँग्रेसने त्यांना सत्तेत असेपर्यंत मंत्रीपदावर कायम ठेवले. मात्र मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची सल राणेंच्या मनात कायम होतीच. 2014 साली काँग्रेसची सत्ता गेली, या निवडणुकीत नारायण राणेंना पराभव पत्करावा लागला.

राणेंना सिंधुदुर्गातील जनतेने दिलेला हा मोठा धक्का होता. राणे मुख्य राजकारणापासून काहीसे दूर गेले. मात्र काँग्रेसने त्यांना 2015 साली वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उभं केलं. इथेही राणेंचा पराभव झाला. तरीही काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेवर आमदार केलं.

काँग्रेस विरोधात असताना खरं तर राणेंना प्रदेशाध्यक्षपदाची आस होती. राज्यात काँग्रेसला पुन्हा बळ देण्यासाठी काय करता येईल याचा प्लॅन घेऊन त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. मागील 12 वर्षात नारायण राणेंना काँग्रेसमध्ये मनासारखे काहीच मिळाले नाही. त्यामुळे अस्वस्थ होणाऱ्या राणेंनी अनेकदा थेट काँग्रेसच्या नेत्यांनाच टार्गेट केले. मात्र राणेंची दखल काँग्रेसकडून घेतली गेली नाही.

खरं तर राणेंचा आक्रमक स्वभावच त्यांना मारक ठरला असं म्हणावं लागेल. समय से पहले और नसीब से ज्यादा कुछ नही मिलता असा मोलाचा सल्ला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नारायण राणेंना दिला होता. हा सल्ला राणेंनी ऐकला असता तर राणेंवर कदाचित काँग्रेस सोडण्याची वेळ आली नसती.