मुंबई : आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेली मराठा जनता आज दक्षिण मुंबईत रस्स्त्यावर उतरली आहे. जसाजसा दिवस सरकत होता तसा मोर्चेकर्यांच्या उत्साहालाही उधाण येत होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मुंबईच्या फास्ट जीवनशैलीचा स्पीड आणि स्पिरीट कायम राखत शांतपणे मराठा क्रांती मोर्च्यालादेखील सुरवात झाली.
मराठा मोर्चेकर्यांची गर्दी, तापतं उन पाहून जागोजागी मोफत पाणी, वैद्यकीय सेवा आणि सुलभ शौचालयाची सुविधा करण्यात आली होती. भायखळा रेल्वे स्टेशनच्या बाहेरदेखील मोती मस्जिद बाहेर मराठा मोर्चेकर्यांसाठी मुस्लीम बांधवांनी मोफत पाण्याची सोय केली होती. यासोबत जेजे उड्डाणपूल, नागपाडा परिसरातील मुस्लिम बांधव देखील मोर्चेकर्यांना मोफत पाणी आणि अल्पोपहार देण्यासाठी पुढे आले होते.
विविधतेत असलेली ही एकता मुंबईत अनेकदा पाहायला मिळते.आणि क्रांती दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित मराठा क्रांती मूक मोर्च्यामध्ये पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला.