मुंबई : जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. पाऊस न थांबल्याने पाणी साचल्याने वाहतूक सेवा ठप्प आहे. अनेक मार्गावर गाड्या खोळंबल्या आहेत. तसेच तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प आहे. त्यामुळे अनेक जण अडकलेत. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून उद्या शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करण्यात आली आहे.
आज झालेल्या अतिवृष्टीचा फटका मुंबईच्या जनजीवनावर झाला असून, उद्या मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. वेधशाळेनं येत्या २४ पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
पावसानं मुंबईला अक्षरशा झोडपून काढलंय. मुंबईतल्या सखल भागांमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाण्याचा निचरा मात्र होत नाहीये. सहा ठिकाणी पंपिंग स्टेशन्समध्ये ३६ पंप सुरू असून पाणी काढण्याचे काम सुरू आहे.
पालिकेचे तब्बल २५ ते ३० हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले असून परिस्थिती हाताळण्यासाठी युद्ध पातळीवर काम असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत जागा न सोडण्याचे आदेश कर्मचा-यांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोणीही घाबरुन जाऊ नका. जे लोक जिथे आहेत तिथेच राहण्याचा प्रयत्न करावा, प्रवास करु असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळ मुंबईकरांचे हाल, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, घरी जाणाऱ्यांचे हाल झालेत. कोणतेही वाहन नसल्याने घरी कसे पोहोयचे असा प्रश्न त्यांना सतावतोय.