मेहनतीचे पैसे सामान्यांनी ठेवायचे तरी कुठे? सामान्यांचा प्रश्न

 पेन्शनचे पैसे अडकल्याने ज्येष्ठ नागरिक हवालदिल झालेत... तर लग्नसराईत बँकेचं विघ्न आल्याने आता जावं तरी कुणाकडे? असा प्रश्न काहींना पडलाय. 

Updated: Apr 18, 2018, 11:53 PM IST
मेहनतीचे पैसे सामान्यांनी ठेवायचे तरी कुठे? सामान्यांचा प्रश्न  title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : 'द सिटी कॉ. ऑप' यांना अचानक रिझर्व्ह बँकेच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशानुसार ग्राहकाची धावपळ सुरू झाली आहे . द सिटी कॉ. ऑप. बँकेबाहेर पडलेला ग्राहकांचा गराडा आणि आक्रोश सध्या दिसून येतोय. द सिटी कॉ.बँकेला अचानक आरबीआयच्या सूचना आल्या आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे बँकेतले आपले पैसे बुडाल्याच्या भीतीने बँक ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी बँकेत धाव घेतली.

कुणाचे पाच लाख, कुणाचे १० दहा लाख तर कुणाची आय़ुष्यभराची कमाई यात अडकलीय. आता बँक ग्राहकांना सहा महिन्यात केवळ हजार रुपयेच काढता येणार आहे. या कालावधीत इनवर्ड आउटवर्ड क्लिअरिंग बंद राहील. तसेच इसीएस, आरटीजीएस आणि एनईएफटीने रक्कम दुसऱ्या बँकेत वळवता येणार नाही. पेन्शनचे पैसे अडकल्याने ज्येष्ठ नागरिक हवालदिल झालेत... तर लग्नसराईत बँकेचं विघ्न आल्याने आता जावं तरी कुणाकडे? असा प्रश्न काहींना पडलाय. 

याविषयी बँक मॅनेजरकडे विचारणा केली असता त्यांनी आरबीआयच्या निर्देशानुसार बँकेचे व्यवहार बंद केल्याचं सांगितलंय. तसेच लवकरात लवकर बॅकेचं विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. 
 
बँकेचे गैरव्यवहार आता रोजचेच झालेत. कधी विजय माल्या तर कधी नीरव मोदी. मात्र, याचा फटका सामान्य जनतेला बसतो. आपली आयुष्यभराची कमावलेली रक्कम सुरक्षित ठेवायची तरी कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडलाय.