Mumbai Temperature : मुंबई कुडकुडली! कपाटातील स्वेटर बाहेर काढण्याची मुंबईकरांवर वेळ, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

Mumbai Weather : रविवारपासून मुंबईतल्या तापमानात घट पाहिला मिळत आहे. सोमवार पहाटे (9 डिसेंबर) मुंबईकरांना महाबळेश्वरचा गारवा अनुभवता आला. 

नेहा चौधरी | Updated: Dec 9, 2024, 09:46 PM IST
Mumbai Temperature : मुंबई कुडकुडली! कपाटातील स्वेटर बाहेर काढण्याची मुंबईकरांवर वेळ, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद  title=

Mumbai Weather : राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर पाहिला मिळतोय. मुंबईकरांना गारेगार थंडीचा अनुभव घेण्यासाठी मुंबईबाहेर पडावं लागतं. तरच त्यांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येतो. पण रविवारपासून मुंबईतील तापमानात घट झाली असून मुंबईकर कुडकुडली आहेत. त्यात सोमवारी (9 डिसेंबर) मुंबईकरांना कपाटातील स्वेटर टोपी काढण्याची वेळ आली आहे. कारण मुंबईत पहाटे गेल्या 9 वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ केंद्रात आज (9 डिसेंबर) 13.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलंय. यापूर्वी डिसेंबर 2015 मध्ये किमान तापमान 11.4 अंश सेल्सियस एवढं खाली गेलं होतं. तर मुंबईत किमान तापमानबद्दल बोलायचं झालं तर ते 19.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी X माध्यमावर याविषयी पोस्ट केली आहे. 

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे येत्या 24 तासांत मुंबई, नाशिक आणि पुण्यनगरीत थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.

जळगाव झाले 'थंड'गाव

राज्यभरात थंडीचा कडाका वाढू लागला असून जळगावचे किमान तापमान 8.6 अंशापर्यंत खाली आलंय. यंदा हवामान विभागाने कडाक्याच्या थंडीचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर देखील परिणाम होत असून, थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविल्या जात आहेत, तसेच सकाळपासूनच शहराच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तीव्र शीतलहरीची शक्यता येत्या 48 तासांत जळगाव जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जळगाव पाठोपाठ नाशिकमध्येही थंडीचा जोर वाढल्याच पाहिला मिळत आहे. नाशिकमध्ये 9.4 अंश तापमानाची नोंद झालीय. नाशिकनंतर पुण्यातही गारवा पाहिला मिळतोय. इथे किमान तापमान 12.0 अंश पाहिला मिळतोय.