Mumbai Spa Murder: 'या लोकांपासून मला धोका', गुरु वाघमारेने 'गजनी'प्रमाणे मांडीवर गोंदवली होती 22 जणांची नावं

Mumbai Spa Murder: पोलिसांनी स्पाचा मालक संतोष शेरेकर (Santosh Sherekar) याला अटक केली आहे. त्याच्याशिवाय दोन कथित हल्लेखोरांनाही अटक करण्यात आली असून आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 26, 2024, 02:50 PM IST
Mumbai Spa Murder: 'या लोकांपासून मला धोका', गुरु वाघमारेने 'गजनी'प्रमाणे मांडीवर गोंदवली होती 22 जणांची नावं title=

Mumbai Spa Murder: मुंबईतील वरळी येथे गुरु वाघमारेच्या (Guru Waghmare) हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना अटक केली आहे. गुरु वाघमारेने आपल्या शरिरावर 22 जणांची नावं गोंदवली होती, ज्यांच्यापासून त्याला धोका होता. गुरु वाघमारेची स्पामध्ये हत्या (Spa Murder) करण्यात आली होती. पोलिसांनी स्पाचा मालक संतोष शेरेकर याला अटक केली आहे. तसंच  त्याच्याशिवाय दोन कथित हल्लेखोरांनाही अटक करण्यात आली असून आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

48 वर्षीय गुरु वाघमारेचा आपण माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचा दावा होता. करणाऱ्या पण त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. बुधवारी पहाटे मुंबईतील वरळी येथील सॉफ्ट टच स्पामध्ये त्याची हत्या करण्यात आली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असता, त्याने मांडीवर आपल्या शत्रूंची नावं लिहिली असल्याचं उघड झालं. 

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरु वाघमारे सतत खंडणीच्या धमक्या देत असल्याने संतोष शेरेकर याने त्याच्या हत्येची सुपारी दिली होती. वाघमारेची हत्या करण्यासाठी त्याने मोहम्मद फिरोज अन्सारी याला 6 लाख दिले होते. 

अन्सारीदेखील स्पा चालवत असल्याने त्याची आणि संतोष याची ओळख होती. पण नालासोपाऱ्यात असणारा त्याचा स्पा गतवर्षी छापा पडल्यानंतर बंद झाला होता. गुरु वाघमारे यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा छापा टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अन्सारीने गुरु वाघमारेला रोखण्यासाठी संतोष शेरेकरकडे मदत मागितली होती. जेणेकरुन तो तक्रारी दाखल करुन, स्पा मालकांकडून पैसे वसुली करणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शेरेकरने अन्सारीला गुरु वाघमारेला संपवण्यास सांगितलं होतं. 

यानंतर अन्सारीने दिल्लीचा रहिवासी असणाऱ्या साकीब अन्सारीशी संपर्क साधला. यानंतर तीन महिन्यांपूर्वी त्यांनी हत्येचा कट आखला असं पोलिसांनी सांगितलं. गुरु वाघमारेवर नजर ठेवल्यानंतर आणि वेळापत्रक पाहिल्यानंतर शेरेकरच्या स्पामध्ये हत्या करण्याची योजना आखण्यात आली. 

वाघमारेने मंगळवारी संध्याकाळी सायनमधील बारमध्ये आपल्या 21 वर्षीय प्रेयसीसबोत वाढदिवस साजरा केला होता. यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेनकोट घातलेले दोन हल्लेखोर त्याचा पाठलाग करत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर रात्री हे दोघे वाघमारेच्या पाठोपाठ स्कूटरवरून शेरेकरच्या स्पामध्ये गेले होते. पोलिसांना हल्लेखोरांपैकी एकाने यूपीआयच्या माध्यमातून पैसे बारजवळील दुकानातून दोन गुटख्याची पाकिटे खरेदी केली असल्याचं आढळललं. UPI रेकॉर्डवरून त्याचे नाव मोहम्मद फिरोज अन्सारी असल्याचं दिसून आलं.

तपासादरम्यान अन्सारीच्या युपीआय आयडीशी संलग्न असलेल्या फोन नंबरवरुन शेखरशी अनेकदा संवाद झाल्याचं उघड झालं. यानंतर दोघांमधील संबंधही समोर आले. बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास फिरोज आणि साकिब अन्सारी स्पामध्ये पोहोचले होते. त्यांनी वाघमारेच्या मैत्रिणीला दुसऱ्या खोलीत नेले आणि त्यानंतर ब्लेडने खून केला.

एका ब्लेडचा वापर त्याचा गळा कापण्यासाठी आणि दुसऱ्याचा त्याला भोसकण्यासाठी करण्यात आला. वाघमारेच्या प्रेयसीने सकाळी 9.30 वाजता हत्येची माहिती मिळाल्याचा दावा केला आहे. तसंच आपण शेरेकरला कळवलं असता त्याने पोलिसांना माहिती देण्यास दोन तासांचा अवधी लागला, असंही सांगितल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी संतोष शेरेकरला आधीच अटक केली आहे. 

त्यानंतर फिरोज अन्सारी याला नालासोपारा येथून गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली, तर साकिब अन्सारी याला राजस्थानमधील कोटा येथून नवी दिल्लीला जाताना आणखी दोन लोकांसह पकडण्यात आले ज्यांचा कटात सहभाग असल्याचा संशय होता, असं अधिकाऱ्याने सांगितले. अशा प्रकारे एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असल्याचं अधिकाऱ्याने म्हटलं आहे. वाघमारेच्या मैत्रिणीच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.

अटक केलेल्या आरोपींपैकी एकाला (साकीब) आणखी दोन संशयितांसह राजस्थानच्या कोटाजवळ गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये पकडल्यानंतर मुंबईत आणले जात होते, असे डीसीपी (डिटेक्शन) दत्ता नलावडे यांनी सांगितले.

वाघमारे 2010 पासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमधील स्पा मालकांकडून पैसे उकळत असे. त्याच्यावर खंडणी, बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, असं एका अधिकाऱ्याने सांगितले. वाघमारे याच्यावर आठ अदखलपात्र गुन्हे आणि २२ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत, असे त्यांनी सांगितले.