पाऊस आणि अंधारामुळे पश्चिम महामार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात

मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केलीय

Updated: Jul 24, 2019, 11:13 AM IST
पाऊस आणि अंधारामुळे पश्चिम महामार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात  title=

मुंबई : मुंबईत मंगळवारी रात्री उशिरा पडलेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांची झोप उडवली. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे आणि अंधारामुळे वाहन चालकांना वाहनं चालवणंही कठिण होऊन बसलं. पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरीतल्या उड्डाणपुलावर बुधवारी सकाळी तीन कारची एकमेकांशी टक्कर होऊन एक विचित्र अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी झाल्याचं समजतंय. मुसळधार पावसामुळे दृष्यमानता कमालीची घटली होती. त्यामुळे हा अपघात झालाय. मुंबईच्या पश्चिम उपनगरात कांदिवली, बोरिवली, दहिसर, अंधेरी, मालाड परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. 

दरम्यान, मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली. मुंबईतल्या दादर, शिवडी, परळ भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी भरलं होतं. हिंदमाता परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं होतं. आता या भागातलं पाणी ओसरायला सुरुवात झालीय. मात्र चेंबुर, गोवंडी, मानखुर्दमध्ये पाऊस पडत असून या भागात पाणीही साचलंय. 

आज दुपारी ४.२४ मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. ३.७५ मीटरच्या लाटा यावेळी उसळणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. मुंबईत येणाऱ्या २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि गोव्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीय. मुंबईत कुलाब्यामध्ये गेल्या १२ तासांत १७१ मिमी तर सांताक्रुझमध्ये ५८ मिमी पावसाची नोंद झालीय.