मुंबई: येत्या ४ मे रोजी देशातील लॉकडाऊन उठला तरी मुंबई आणि पुण्यातील निर्बंध १८ मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. त्यांनी शनिवारी 'मिंट' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना यासंदर्भात खुलासा केला. यावेळी टोपे यांनी म्हटले की, कोरोनाचा प्रसार रोखणे हे लॉकडाऊनचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जात नसेल तर आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल, असे टोपे यांनी सांगितले.
...तोपर्यंत मुंबईतली दुकाने बंदच राहणार
सध्याच्या घडीला झोपडपट्ट्यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या हा चिंतेचा मुख्य विषय आहे. आपल्याला कंटेन्मेंट झोनचा परिसर पूर्णपणे रिकामा राहील, याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या परिसरांसाठी आपल्याला ३ मे नंतर आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवावा लागू शकतो, अशी माहिती टोपे यांनी दिली.
त्यामुळे मुंबई-पुणेकरांना ३मेनंतर आणखी १५ दिवस घरात थांबावं लागण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. कोरोनाचे सर्वात जास्त हॉटस्पॉट या दोन शहरांमध्ये आहेत. मुंबईतील तब्बल आठ वॉर्डमधील परिस्थिती अतिगंभीर आहे. यापैकी प्रत्येक वॉर्डात कोरोनाचे २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर पुण्यातही कोरोनाच्या मृतांचा आकडा जास्त आहे.
तरी याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यातच होईल. येत्या सोमवारी देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक होणार आहे. ही बैठक झाल्यानंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत राज्य सरकार आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी राज्यात कोरोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ६८१७ इतका झाला आहे. यापैकी ४,४४७ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. तर पुण्यात कोरोनाचे १०२० रुग्ण आढळून आले आहेत.
लॉकडाऊनबाबत राज्य सरकार विचार करत असलेले पर्याय खालीलप्रमाणे
- लॉकडाऊनचा कालावधी काही काळ वाढवायचा
- हा कालावधी वाढवताना रेड झोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील लॉकडाऊनमध्ये आणखी सूट द्यायची
- संपूर्ण रेड झोनमध्ये लॉकडाऊन कायम ठेवायचा
- अथवा संपूर्ण राज्यातील केवळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कॉन्टोनमेंट भागातील लॉकडाऊन कायम ठेवून इतर भागातील लॉकडाऊन उठवायचा किंवा शिथिल करायचा.