Mumbai News : कोस्टल रोडच्या कामांमुळे मुंबईतील वाहतूक मार्गात बदल; पुढील पाच महिने हेच चित्र

Mumbai News : किती ते ट्रॅफिक म्हणणाऱ्यांनो... मुंबईत पुढचे पाच महिने हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठीची सविस्तर माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलीये. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी बदललेले मार्ग पाहाच   

Updated: Mar 21, 2023, 08:45 AM IST
Mumbai News : कोस्टल रोडच्या कामांमुळे मुंबईतील वाहतूक मार्गात बदल; पुढील पाच महिने हेच चित्र  title=
Mumbai people to face city traffic routes changed issues as coastal road project will take more time

Mumbai News : साधारण दशकभराचा काळ मागं गेल्यास मुंबई (Mumbai Roads) किती बदलली आहे याचा अगदी सहज अंदाज लावता येत आहे. मोनो (Monorail), मेट्रो (Mumbai Metro), विविध उड्डाण पूल आणि आता कोस्टल रोड अशा नवनवीन प्रकल्पांमुळं मुंबईचा चेहरामोहराच बदलत चालला आहे. त्यातच शहरात वाढणारी खासगी वाहनांची संख्या आणि त्यामुळं होणारी वाहतूक कोंडीची समस्याही दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कधीएकेकाळी सहज सोपा वाटणारा मुंबईतील प्रवास आता तितकाच किचकट वाटू लागला आहे. कारण, ठरतंय ते म्हणजे शहरातील मुख्य रस्ते आणि आताआता गल्लीबोळातही होणारी वाहतूक कोंडी. (Mumbai people to face city traffic routes changed issues as coastal road project will take more time)

पुढील पाच महिने दक्षिण मुंबईतील वाहतूक नियमांत बदल 

वाहतूक कोंडीची हीच समस्या सुटत नाही, तोच मुंबईकरांचं लक्ष वेधणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. ज्यानुसार (coastal road project) कोस्टल रोड बांधकामामुळे पुढील पाच महिने मुंबईतील वाहतुकीच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती देत एका पत्रकाचा फोटो शेअर केला. 

कुठे प्रवास करणं टाळाल? 

वाहतूक पोलीस आणि पालिकेनं केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी प्रवासाठी एनएस मार्गाचा वापर टाळावा. दक्षिण मुंबईतून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी महर्षी कर्वे रोड, केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी हॉस्पिटल, चर्चगेट स्टेशन या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 

कोणत्या मार्गावर सुरु आहे कोस्टल रोडचं काम? 

सध्या शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात असून, मरीन ड्राइव्हजवळील एनएस मार्गावर हे काम प्रगतीपथावर आहे. याआधीचा टप्पा म्हणजे मरीन ड्राइव्हच्या दक्षिणेकडे असणाऱ्या कॅरेजवेवर, तारापोरवाला मत्स्यालय ते इस्लाम जिमखाना या मार्गावरील एस.डब्लू.डी. ड्रेनेज आउटफॉलचं काम होणं अपेक्षित आहे. 

सदरील कामाची व्याप्ती पाहता त्यासाठी किमान 5 महिन्यांचा कालावधी लागणार असल्यामुळं याच धर्तीवर या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 

हेसुद्धा वाचा : Mumbai Rains : मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, उपनगरात काय परिस्थिती? 

 

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार SWD ड्रेनेज आउटफॉलचं काम मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यात सुरू होणार आहे.  ज्यामुळं एनएस मार्गावरून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक जिमखान्याजवळील सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे. परिणामस्वरुप दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.