सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : शहरात यंदा दिवाळीत मागच्या वर्षीच्या तुलनेत फटाके कमी फोडले गेले आहेत, तरी हवेचा दर्जा काही शहरात अतिवाईट झालेला पाहायला मिळतोय. ज्याचा परिणाम म्हणजे सकाळच्या वेळात पाहायला मिळणारे धुरके. 'सफर' या प्रदूषणमापन प्रणालीतर्फे मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईत बोरिवली, अंधेरी, मालाड, माझगांव या ठिकाणी हवेच्या स्तरावर परिणाम झाला आहे.
अंधेरीची हवा सातत्याने 'अतिवाईट' स्तरावर नोंदवली गेली. तर मालाड, बोरिवली येथील हवा 'वाईट' ते 'अतिवाईट' दरम्यान दिवसागणिक बदलत आहे. प्रदूषित वायूंच्या घटकाचे आणि धूळ मातीचे प्रमाण वाढल्याने मुंबईत सकाळी धुरके तयार होत आहे.