पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जवाबदार कोण? घरी परतत असतानाच मांजाने घेतला समीर जाधवचा बळी

Mumbai Police : चायनीज मांजामुळे मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्तव्यावरुन घरी परतत असतानाच पोलीस कर्मचाऱ्याचा मांजामुळे गळा चिरला होता. जखमी अवस्थेत पोलीस हवालदाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आकाश नेटके | Updated: Dec 25, 2023, 10:22 AM IST
पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जवाबदार कोण? घरी परतत असतानाच मांजाने घेतला समीर जाधवचा बळी title=

Mumbai News : मुंबईन एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. पतंगाच्या मांजाने गळा चिरल्याने मुंबईतील एका 37 वर्षीय पोलीस हवालदाराचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. घरी परतत असतानाच पोलीस हवालदारावर काळाने घाला घातला आहे. वाटेतच पोलीस हवालदाराचा गळा चिरला गेल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेनं पोलीस हवालदराच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कर्तव्य संपवून घरी परतत असताना पतंगाने गळा चिरल्याने मुंबईत एका पोलीस हवालदाराचा रविवारी मृत्यू झाला. हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. चायनीज मांजामुळे गळा चिरण्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. मात्र अशा घटनांनंतरही मांजाच्या विक्रीवर बंद झालेली दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा चायनीज मांजामुळे एका पोलीस हवालदाराला जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर सुरेश जाधव असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वरळी येथील बीडीडी चाळीत कुटुंबासह राहणारे समीर जाधव हे दिंडोशी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून तैनात होते. रविवारी दुपारी समीर काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते. त्याचवेळी वाकोला पुलावरून जात असताना अचानक त्यांच्यासमोर पतंगाचा मांजा आला. मांजापासून वाचवण्याच्या प्रयत्नात असतानाच तो त्यांच्या गळ्यात अडकून पडला. त्यामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मानेतून रक्त वाहत असल्याचे पाहून समीरने स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात केला. या प्रयत्नात ते बाईकवरुन खाली पडले. तिथून जात असलेल्या एका वाहनचालकाने हा प्रकार पाहताच काही अंतरावर गस्तीवर उपस्थित असलेल्या खेरवाडी पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या जाधव यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जाधव यांच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. ते पोलीस दलात असल्याची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली. समीर जाधव यांच्या निधनाच्या वृत्ताने वरळी बीडीडी चाळीत शोककळा पसरली आहे.

दुसरीकडे, याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या मांजामुळे अनेकांना जीव गमवावा लागत  आहे. पक्ष्यांसाठी हा मांजा अत्यंत धोकादायक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक संस्था नायलॉन मांजावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकदा बाईकस्वारांना या मांजाच्या विळख्यामुळे जीव गमवावा लागला आहे. चायनीज मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून सातत्याने होत आहे.