मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिका (BMC School) शाळांचा दर्जा उचांवण्यासाठी आणि पालिका शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थांनी शिक्षण घ्यावे यासाठी मुंबई महापालिका सातत्याने काही ना काही प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून अर्थसंकल्पात शिक्षणासाठी भरीव अशी तरतूद सुरु केली आहे.
विद्यार्थ्यांचा गणवेश बदलणार
मुंबईतील अधिकाधिक विद्यार्थांनी पालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी मिशन ऍडमिशन ही मोहीमदेखील हाती घेतली आहे. याशिवाय शाळा अधिकाधिक आकर्षित दिसाव्यात यासाठी शाळांना रंगरंगोटी आणि आकर्षक असे स्वरुप दिले जात आहे. एवढच नव्हे तर आता विद्यार्थांचाही मेकओव्हरही केला जाणार आहे. कारण मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थांचे गणवेश आता बदलले जाणार आहे. तब्बल 13 वर्षांनंतर पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे गणवेश बदलले जाणार आहेत. यापूर्वी 2009 मध्ये महापालिका शाळांचा गणवेश बदलला होता.
जुलै महिन्यात नवीन गणवेश उपलब्ध होणार
जुलै महिन्यात विद्यार्थांना नवीन गणवेश उपलब्ध होईल. विद्यार्थांना वाटप करण्यात येणाऱ्या 27 शालेय वस्तूंमध्ये गणवेशाचाही समावेश असेल अशी माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. गणवेशाची डिझाईन फायनल करण्यात आली आहे. या डिझाईनला अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर लवकरच गणवेशाची निविदा प्रक्रिया निघून शाळांमध्ये हे गणवेश वितरणासाठी उपलब्ध होतील. त्यामुळे या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वापरासाठी उपलब्ध होतील असेही पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कसा असेल पालिका शाळेचा नवा गणवेश ?
मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा गणवेश हा निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा होता. मात्र हा निळा आणि पांढरा रंगाचा गणवेश पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगावर दिसणार नाही. तर क्रीम रंगाची पँट आणि चॉकलेटी रंगाचा शर्ट गणवेश विद्यार्थ्यांच्या अंगावर दिसणार आहे.
आता क्रीम रंगाची ट्राऊजर आणि चॉकलेटी रंगाचे चेक्सचे शर्ट विद्यार्थ्यांसाठी गणवेश असेल. तर विद्यार्थीनींसाठी क्रीम रंगाचा स्कर्ट आणि चॉकलेटी रंगाचे चेक्सचे शर्ट तर मोठ्या इयत्तेतील मुलींसाठी चुडीदार याच रंगसंगतीचा असेल.
अशा रंगसंगतीचा गणवेश यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये काही विशिष्ट डिझाईन गणवेशासाठी निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा मुंबई महापालिका शाळेच्या विद्यार्थांचाही एकप्रकारे मेकओव्हर झालेला पाहायला मिळेल.