कॉंग्रेसने मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी धर्म पाळला

शिवसेना आणि कॉंग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी 

Updated: Oct 5, 2020, 12:33 PM IST
कॉंग्रेसने मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी धर्म पाळला title=

मुंबई : मुंबई महापालिकेत शिक्षण समिती निवडणूकीत कॉंग्रेसने  महाविकास आघाडी धर्म पाळल्याचे दिसून आले. मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यात आला. आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला. यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी असल्याचे दिसून आले. यामुळे शिवसेनेच्या संध्या दोशी यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सर्व प्रकारामुळे महापालिकेतील शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे मनसूबे फोल ठरले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीत वितुष्ट नको म्हणून कॉंग्रेसनं आज महापालिकेतील समित्यांच्या पहिल्या समितीच्या- शिक्षण समितीच्या निवडणूकीत अध्यक्षपदाचा उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. 

कॉंग्रेसने अर्ज मागे घेतला नसता तर भाजपनं कॉंग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान उभे केले असते. 

स्थायी समितीत देखील हेच चित्र राहणार आहे. तिथंही काँग्रेस माघार घेणार आहे. मतदानाच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपा शिवसेनेला मतदान करेल अशी रणनिती आहे.

शिक्षण समितीतील संख्याबळ

शिवसेना ११
भाजपा ९
काँग्रेस ४ 
राष्ट्रवादी काँग्रेस-१
सपा - १