मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने (MHADA Mumbai Board) घरांच्या शोध मोहिमेला सुरूवात केली आहे. त्यानुसार मुंबईतल्या (Mumbai) गोरेगावमध्ये चालू बांधकाम प्रकल्पातील अडीच हजार घरांचा लॉटरीत (MHADA housing lottery) समावेश करण्यात येणार आहे. या घरांचा आकडा आणखी वाढवण्यासाठी विखुरलेली घरे शोधली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबईत याआधी जून २०१९ मध्ये लॉटरी निघाली होती. विशेष म्हणजे मुंबईत लॉटरीसाठी घरेच नसल्याने म्हाडाने (MHADA house) दोन वर्षं लॉटरी निघणार नाही, असे सांगितले होते. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील घरांसाठी लवकरच लॉटरी काढू असे जाहीर केले.
त्यानंतर आता लवकरच नव्या वर्षात लॉटरी (MHADA housing lottery) काढण्यासाठी मुंबई मंडळाकडून घरांची शोधाशोध सुरू झाली आहे. गोरेगावमध्ये सुमारे सात हजार घरे बांधण्यात येत आहेत. यातील सुमारे अडीच हजार घरे लॉटरीत उपलब्ध होऊ शकणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.