मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रो मार्ग ७ए संदर्भात महत्वाची अपडेट समोर

Mumbai Metro Route 7A: मुंबई मेट्रो मार्ग 7 अ प्रकल्पाच्या मार्गातील 2.49 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी टी ६२ या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभिक भुयारीकरणाचे काम सुरु झाले असून, ही प्रारंभिक मोहीम एक महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे, त्यानंतर अंतिम मोहिमेला सुरूवात करण्यात येईल. प्रकल्पातील भुयारीकरणाचे काम महत्त्वपूर्ण असून मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Sep 3, 2023, 02:12 PM IST
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रो मार्ग ७ए संदर्भात महत्वाची अपडेट समोर  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने  मुंबई मेट्रो 7 अ च्या मार्गातील बोगद्यासाठी पहिल्या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने भुयारीकरणाचे काम सुरू केले असून, प्रकल्पातील ही महत्त्वपूर्ण प्रगती आहे. मुंबई मेट्रो मार्ग ७ चा विस्तार असणारी मेट्रो 7अ  प्रकल्पातील ही प्रगती मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सुमारे 3.442 किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग 7 अ प्रकल्पाच्या मार्गातील 2.49 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी टी ६२ या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभिक भुयारीकरणाचे काम सुरु झाले असून, ही प्रारंभिक मोहीम एक महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे, त्यानंतर अंतिम मोहिमेला सुरूवात करण्यात येईल. प्रकल्पातील भुयारीकरणाचे काम महत्त्वपूर्ण असून मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष आहे. 

टी 62 टनल बोरिंग मशीनच्या मदतीने भुयारीकरण सुरू

यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 12 ते 28 मीटर इतका खोल बोगदा असणार आहे. ज्याच्यामुळे भूमिगत मेट्रो ते उन्नत मेट्रोपर्यंतचा प्रवास सुलभतेने होणार आहे. हे काम निर्धारीत वेळेत पूर्ण व्हावे या साठी 24 तास भुयारीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त केलेले संघ प्रमुख (टीम लीडर्स) हे या कामाची  देखरेख करून प्रकल्पाची प्रगती सुनिश्चित करतील. मेट्रो मार्ग ७अ च्या बोगद्याच्या मार्गात अडसर ठरणारी भुयारी गटर लाईन मायक्रो टनलिंग पद्धतीचा वापर करून यशस्वीरित्या वळवली. या मर्गिकेतील अत्यंत महत्त्वाचा असलेला हा टप्पा 30 जानेवारी 2023 रोजी पार करून टीमने हे काम कुशलतेने यशस्वीरीत्या पूर्ण केले होते.  

मुंबई मेट्रो मार्ग 7ए ची मुंबईतील प्रमुख ठिकाणांसोबत जोडणी

कार्यान्वयीत असलेल्या मेट्रो मार्ग 7 चा विस्तार असलेली, अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान सुमारे 3.442 किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग 7 अ प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीमध्ये सकारात्मक परिवर्तन निश्चित घडेल. या मार्गिकेतील अंशतः भाग पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि सहार उन्नत मार्गास समांतर धावते. ही मेट्रो मार्गिका छ.शि.म.आं. विमानतळासोबत मिरा-भाईंदर शहरास मेट्रो मार्ग 9 च्या सहायाने तर पश्चिम उपनगरांना मेट्रो मार्ग 2अ आणि 7 च्या सहाय्याने थेट जोडते. 

तसेच मेट्रो मार्ग 7 अ चे छ.शि.म.आं.वि. स्थानक आणि मेट्रो मार्ग 3 चे भूमिगत स्थानक हे समांतर आणि पेड- टू- पेड आणि अनपेड- टू- अनपेड भागात कॉन्कोर्स स्तरावर जोडले जाणार आहेत. त्यामुळे या मार्गिकेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो मार्ग ३ आणि आंतराष्ट्रीय विमानतळादरम्यान भूमिगत स्थानकावर आंतरबदल(interchange) करण्याची सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे विमानतळापर्यंतच्या प्रवासाचा कालावधीत 30-60 मिनिटांनी कमी होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसोबतच इतर शहरांची जोडणी अधिक वेगवान करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्ग 8 द्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत जोडण्यासाठी मुंबई मेट्रो मार्ग 7 अ एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. 

"मेट्रो मार्ग ७ ए च्या पूर्णत्वानंतर वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होईल. त्यासोबतच इंधनाचा वापर कमी होऊन वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल ज्याचा फायदा हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी होईल. ही मार्गिका भविष्यात मुंबई शहर, उपनगर यांना आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत जोडणारी दुवा ठरणार असल्याने  रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. या सर्व बाबींचा विचार करता  7 अ मुळे शहारांच्या तसेच मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक वाढीस चालना मिळण्यासोबत पर्यावरण संवर्धन देखील घडवून आणण्यास मदत होईल." अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.