Mantralay : मंत्रालय... म्हणजे जिथून राज्याचा गाडा हाकला जातो ती इमारत. मोठा पोलीस बंदोबस्त. शेकडो कार्यालयं. रोज मंत्र्यापासून सर्वसामान्यांची ये-जा असलेली ही भव्यदिव्य इमारत. राज्याच्या महत्त्वाच्या निर्णयांची याच इमारतीमधून प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाते. आता याच मंत्रालयाचा कायापालट होणार आहे. संपूर्ण मंत्रालयाचा पूनर्विकास करण्यात येणार आहे. सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात महाविस्टा प्रकल्प (Maha Vista Project) राबवण्यात येणार आहे.. या अंतर्गत मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आणि त्या परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे. या आराखड्यासाठी राज्य सरकारने जागतिक निविदा काढल्या आहेत.
'या' इमारतींचा होणार पुनर्विकास
मंत्रालयाची मुख्य इमारत
विस्तारित इमारत
आकाशवाणी आमदार निवास
प्रशासकीय इमारत
मंत्र्यांचे बंगले
महात्मा गांधी गार्डन
शासकीय निवासस्थाने
मंत्रालयाला 2012 मध्ये भीषण आग लागली होती. त्याच आगीच्या दुर्घटनेनंतर मंत्रालयाच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला. प्रत्यक्षात मात्र काहीच घडलं नाही. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. शिंदे आणि फडणवीसांचं महायुती सरकार आलं. त्यावेळी पुनर्विकासाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरु झाली. आता बांधकाम विभागाने 5 ऑगस्टला यासंदर्भातली निविदा प्रसिद्ध केलीय. त्यामुळे लवकरच मंत्रालय आणि परिसराचा कायापालट होईल. सध्या मंत्रालयाचा पुनर्विकासाची निविदा काढण्यात आलीय. मात्र फेब्रुवारीच्या अंतरिम अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण विधानभवन परिसराचाही पुनर्विकास करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्याच्या आराखड्यासाठीही लवकरच जागतिक निविदा काढण्यात येणार आहेत.