अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेशी संबंधित महत्वाची बातमी

रेल्वेने प्रवास करण्याअगोदर ही महत्वाची बातमी वाचा 

Updated: Jun 27, 2020, 01:26 PM IST
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेशी संबंधित महत्वाची बातमी  title=

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ८४ दिवसांनंतर मध्य रेल्वे १५ जून रोजी धावली. आता १३ दिवसांनंतर रेल्वेचा मेगा ब्लॉक रविवारी २८ जून रोजी असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपलं आयकार्ड दाखवून यावेळी प्रवास करत आहेत. सामान्यांसाठी रेल्वेने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.  

  रविवार  विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मध्य रेल्वे मुंबई विभाग आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक संचालीत  करणार आहे. या मार्गांवर अशा पद्धतीने मेगाब्लॉक करत आहे. 

 मुख्य मार्ग  (Main Line)

  • अप व डाउन  जलद मार्गावर विद्याविहार - मुलुंड दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० पर्यंत  या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. 
  •   सकाळी १०.१६ ते दुपारी २.१७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या डाउन जलद विशेष लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धिम्या (स्लो) मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यांवर  थांबतील त्यानंतर मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.
  •  दुपारी १२.४१ ते दुपारी ३.२५ या वेळेत ठाणे येथून सुटणा-या जलद विशेष लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर कळविण्यात येऊन निर्धारित थांब्यांवर थांबविण्यात येतील आणि माटुंगा येथे अप जलद (फास्ट) मार्गावर वळविण्यात येतील.
  • महात्वाची गोष्ट म्हणजे काही ठाणे व कल्याण लोकल रद्द केल्या जातील परंतु राज्य शासनाने निश्चित केलेल्या  अत्यावश्यक सेवेतील   कर्मचार्‍यांसाठी पुरेशा सेवा चालविण्यात येतील.
  •  ब्लॉक कालावधी दरम्यान मेल / एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते विद्याविहार दरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर वळविण्यात येतील.

 हार्बर लाइन 

  • पनवेल- वाशी दरम्यान अप व डाउन  हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमध्ये नेरूळ / बेलापूर-खारकोपर हार्बर लाइनचा समावेश असणार आहे. 
  •  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.०० पर्यंत  पनवेलला जाणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध होणार नाहीत.
  •  पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१५ ते दुपारी ४.००  वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाही.
  •    तथापि, ब्लॉक कालावधीत विशेष लोकल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - मानखुर्द- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या विभागात धावतील.पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत.