मुंबई: मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसामन्य नागरिकांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. 15 ऑगस्टपासून सर्वसामन्य नागरिकांना लोकल सुरू होणार आहे. मात्र त्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याचं सांगितलं आहे.
मुंबईकरांसाठी आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमचे लसीचे दोन्ही डोस झाले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. याचं कारण म्हणजे लोकल प्रवास करण्यासाठी तुम्ही दोन्ही डोस घेतले असल्याचं सर्टिफिकेट दाखवावं लागणार आहे. इतकंच नाही तर दोन डोस घेऊन झाल्यानंतर 14 दिवसांनी लोकल प्रवास करता येणार आहे.
तुम्हाला जर लोकलचं तिकीट किंवा पास मिळवायचा असेल तर तो कसा मिळणार असा प्रश्न पडला असेल? तर यासंदर्भातही माहिती देण्यात आली आहे.
-तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे. त्यानंतर 14 दिवसांनी तुम्हाला प्रवास करता येणार
-15 ऑगस्टपासून लोकलनं प्रवास करता येणार
- महिन्याचा पास मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला वॉर्ड ऑफीस किंवा उपनगरातील रेल्वे स्थानकात पास मिळू शकेल
-पासवरील क्यूआर कोड स्कॅन केला जाईल
-त्यामुळे तुमचा पास कोव्हिड सर्टिफिकेट खरं आहे की खोटं याची माहिती मिळू शकेल.
ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्याचं काय?
पास डाऊनलोड करण्यासाठी स्मार्टफोन हवाय. पण ज्यांच्याकडे पास नाही, त्यांचाही विचार सरकारने केला आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांना शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमधून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेता येणार आहे. विशेष म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड (Q R CODE) असणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.
अशी होणार अंमलबजावणी
कोरोनाचे डोस घेतलेल्यांना परवानगी मिळालेली आहे. पण आता यातून काही जण पळवाट शोधून गैरमार्गाने रेल्वे प्रवास करतील. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी एक सिस्टम सरकारने तयार केली आहे. त्यानुसार ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्या प्रवाशांना मोबाईल एपच्या (Mobile App) मदतीने रेल्वे पास डाऊनलोड करता येणार आहे.