कुर्ला लोकल कायमची रद्द? दादर स्टेशनवर...; मुंबईकर चाकरमान्यांसाठी Good News

Mumbai Local Train Central Railway Update: सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकल ट्रेनच्या 270 फेऱ्या होतात. 15 डब्ब्यांच्या गाड्यांच्या 22 फेऱ्या होतात. तर 12 डब्ब्याच्या गाड्यांच्या 248 फेऱ्या होतात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 22, 2024, 12:43 PM IST
कुर्ला लोकल कायमची रद्द? दादर स्टेशनवर...; मुंबईकर चाकरमान्यांसाठी Good News title=
अनेक महत्त्वाचे बदल होणार

Mumbai Local Train Central Railway Update: लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रवासी संख्येचा वाढता भार कमी करुन प्रवास अधिक वेगवलान करण्याच्या दृष्टीने मध्ये रेल्वेच्या मार्गावर 10 जलद उपनगरी लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील नियोजन सध्या केलं जात असून सर्वाधिक गर्दीचं स्थानक असलेल्या दादर स्थानकामधून कल्याणसाठी या गाड्या सोडल्या जातील. विशेष म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला लोकल रद्द करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

दादर स्थानकात पुन्हा बदल

दादर स्थानकावरुन मध्य रेल्वेचे 3 लाखांहून अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. त्याचप्रमाणे दादर स्थानकामध्ये मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेने प्रवास करणारे प्रवासीही आहेत. प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करताना रेल्वे सुरक्षा विभागाची तारंबळ उडताना दिसते. फ्लॅटफॉर्म क्रमांक 8 (मध्य रेल्वेचा पूर्वीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1) च्या रुंदीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलं असून आता प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 वर लोकल टर्मिनल करण्याचा विचार सुरु आहे. प्लॅटफॉर्म 10 वर 11 दरम्यान डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्म करण्याचा विचार आहे. म्हणजेच या प्लॅटफॉर्मवर दोन्ही बाजूने प्रवाशांना उतरता येणार आहे. 

...म्हणून अतिरिक्त लोकल शक्यच नाही

मध्य रेल्वेच्या मार्गावर जादा जलद लोकल चालवण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र वंदे भारत एक्सप्रेस, एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर आहे. सर्वासाधारण लोकल ट्रेनऐवजी एसी लोकल चालवल्या जात आहेत. सध्या एसी लोकलच्या 66 फेऱ्या होतात. एसी लोकलमुळेच पिक अवर्समध्ये गर्दी होते असं प्रवासी संघटनांचं म्हणणं आहे. म्हणूनच जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी केली जाते. मात्र नव्या वेळापत्रकात एकही सर्वसाधारण लोकल ट्रेन अतिरिक्त सोडली जाणार नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. वंदे भारत एक्सप्रेस, एसी लोकल, विशेष रेल्वे गाड्यांची संख्या आणि मर्यादित रेल्वे मार्ग असल्याने अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची शक्यता फारच धुसर आहे.

वाचाः कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत कधी? आता उद्घाटनासाठी आली नवी तारीख

कुर्ला लोकल रद्द?

मध्य रेल्वेवरुन सीएसएमटी-कुर्ला लोकल गाड्यांच्या बऱ्याच फेऱ्या होतात. मात्र अनेकदा कुर्ला गाड्या रद्द केल्या जातात. परिणामी नव्या वेळापत्रकामध्ये कुर्ला गाडी रद्द करण्याचे नियोजन आहे. कुर्ला गाड्यांचा विस्तार ठाण्यापर्यंत करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकल ट्रेनच्या 270 फेऱ्या होतात. 15 डब्ब्यांच्या गाड्यांच्या 22 फेऱ्या होतात. तर 12 डब्ब्याच्या गाड्यांच्या 248 फेऱ्या होतात.