Mumbai Local : रविवारी बिनधास्त फिरा; गणेशभक्तांसाठी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द

Mumbai News : सध्या मुंबईत गणेशोत्सवाची एकच धूम पहायला मिळत आहे. अशा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेकजण शहरातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत.   

सायली पाटील | Updated: Sep 23, 2023, 07:42 AM IST
Mumbai Local : रविवारी बिनधास्त फिरा; गणेशभक्तांसाठी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द  title=
Mumbai local no mega block on central and western railway amid ongoing ganeshotsav 2023

Mumbai Local : रविवार, सुट्टीचा दिवस हा अनेकांसाठी आरामाचा तर, अनेकांसाठी भटकंतीचा असतो. आठवडी सुट्टीला एखाद्या छान ठिकाणाला भेट देण्याकडे अनेकांचाच कल. त्यातही मुंबईच्या दिशेनं येणारी गर्दीही तुलनेनं मोठी. अशा या मुंबईत सध्या उत्साह पाहायला मिळतोय तो म्हणजे गणेशोत्सवाचा. मोठमोठ्या गणेश मूर्ती, प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळं आणि बहुविध देखावे पाहण्यासाठी जो-तो गर्दी करताना दिसत आहे. शहरातून आणि शहराबाहेरूनही अनेक मंडळींचा यात सहभाग आहे. 

शहरातील हे एकंदर चित्र पाहचा नागरिकांना प्रवास करताना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आता रेल्वे प्रशासनानं मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सहसा रविवारी काही तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मुंबई रेल्वे विभागाकडून विविध रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जातो. पण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 24 सप्टेंबर 2023 ला येणारा रविवार मात्र याला अपवाद ठरणार आहे.

हेसुद्धा वाचा : नागपुरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; राज्यात पुढील 48 तास पावसाचे, हवामान विभागाचा इशारा

 

गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वे 24/09/2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण सेक्शन मेन लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल हार्बर लाईनसह ट्रान्स-हार्बर लाईन आणि बी एस यु लाईन उपनगरीय सेक्शनवर कोणताही मेगाब्लॉक घेणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून ट्विट करत देण्यात आली आहे. 

पश्चिम रेल्वेवरही मेगाब्लॉक नाही... 

मध्य रेल्वेप्रमाणं पश्चिम रेल्वेवरही 24 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार बोरिवली आणि भाईंदर या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळ दुरुस्ती, देखभाल आणि ओवरहेड यंत्रणांच्या कामांसाठी शनिवारी रात्री 00.30 ते रविवारी पहाटे 04.30 वाजेपर्यंत नाईट ब्लॉक घेण्यात येईल. याव्यतिरिक्त कोणताही ब्लॉक इथंही लागू नसेल. 

हार्बर मार्गावरही हेच चित्र असल्यामुळं रविवारी मुंबई लोकल पूर्ण क्षमतेनं रुळावर धावणार असून, प्रवाशांच्या सेवेसाठी हजर असणार आहेत. त्यामुळं रविवारी बिनधास्त फिरा!