नेहा सिंग, झी मीडिया, मुंबई : मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी पुढील महिन्यापासून फेरी आणि क्रूझ सेवा सुरू होणाराय... त्यामुळं आता गोव्याला जाण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि विमान सेवेशिवाय समुद्र प्रवासाचा चौथा पर्याय उपलब्ध होणाराय...
थर्टी फर्स्टच्या निमित्तानं गोव्याला जायचा बेत असेल तर तुमच्यासाठी ही खास खुशखबर... आता अरबी समुद्रातल्या लाटांवर स्वार होत तुम्हाला मुंबईहून गोव्याला जाता येणाराय... गेल्या अनेक दशकांपासून बंद पडलेली मुंबई - गोवा फेरी सेवा पुन्हा सुरू करण्याचं सरकारनं ठरवलंय. त्याशिवाय गोव्याला जाण्यासाठी क्रूझ सेवा देखील पुढच्या महिन्यापासून सुरू होणाराय...
मुंबईच्या डॉकयार्ड भागातून या दोन्ही सेवा सुरू होतील. सध्या रस्त्याने गोव्याला जाण्यासाठी 11 ते 12 तास लागतात, तर रेल्वेनं 12 तास लागतात... पण समुद्र मार्गे केवळ 8 तासामध्ये हे अंतर कापता येणाराय... या सेवेसाठी किती भाडं आकारलं जाणाराय, हे अद्याप ठरलेलं नाही. या फेरीत सुमारे 250 प्रवाशांना एकाचवेळी प्रवास करता येईल. दिघी, दाभोळ, विजयदुर्ग, मालवण आणि पणजी अशा पाच ठिकाणी या बोटी थांबतील.
वर्षअखेरीस गोव्याच्या दिशेनं पर्यटकांची रीघ लागलेली असते. त्यामुळं पर्यटकांचा या बोट सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय किनारी भागात राहणा-या लोकांना रोजगारही मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईसह देशभरातल्या किनारी भागात सागरी वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकारनं आखलंय. प्रवासी आणि माल वाहतुकीच्या दृष्टीनं सुलभता आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यामुळं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील भारही कमी होईल, अशी अपेक्षा आहे...