Ghatkopar Hording Collapsed : सोमवार दुपारची वेळ, मुंबईत अचानक वादळी वारा वाहू लागला, मुंबईत धुळीचे लोट पसरले. मुंबईत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहत होते. आणि त्याचवेळी घाटकोपरमध्ये (Ghatkopar) मोठी दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यात 120 बाय 120 फूटांचं महाकाय लोखंडी होर्डिंग पत्त्यासारखा कोसळला (Hording Collapsed). क्षणात होत्याचं नव्हतं झालं. होर्डिंग खाली अनेक जण दबले गेले. कोणाच्या तरी निष्काळजीपणामळे 14 मुंबईकरांचे हकनाक बळी गेले. यातलाच एक होता घाटकोपरमधला 24 वर्षांचा भरत राडोठ. (Bhrat Rathod)
पेट्रोल भरायला गेला आणि...
24 वर्षांचा भरत राठोड घाटकोपरच्या गोळीबार परिसरात राहात होता. सोमवारी तो पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर गेला होता. पण पुन्हा घरी परतलाच नाही. काळाने त्याच्यावर घाला घातला. 24 वर्षांचा भरत राठोड हा कुटुंबातला सर्वात मोठा मुलगा. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या एकट्याच्या खांद्यावर होती. मेडिकलमध्ये डिलिव्हरी करण्याचं काम भरत राठोड करायचा. सोमवारीही तो डिलिव्हरीसाठीच बाहेर पडला मात्र परत घरी परतलाच नाही..
भरत हा कुटुंबातला कमावणारा एकमेव आधार होता. त्याला छोटा भाऊ आहे. वडिलांची तब्येत ठिक नसल्याने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केलंय. तर कोरोना काळात भरतच्या आईचं निधन झालं. भरतच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांचा आधार हरपलाय. बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्यांमुळे राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
मेडिकलमध्ये काम करुन परिवाराचा गाडा भरत हाकत होता. कुटुंबाचा आधार असलेल्या थोरल्या मुलावरच काळाने घाला घातल्याने राठोड कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.. बेकायदेशीर होर्डिंग उभारणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भरत राठोडच्या कुटुंबियांनी केलीय.
दुर्घटनेला जबाबदार भावेश भिंडेवर गुन्हा दाखल
इगो मीडिया कंपनीने हे होर्डिंग्ज लावले होते आणि कंपनीचा मालक आहे भावेश भिंडे (Bhavesh Bhinde). याच भावेश भिंडेंने विधानसभेचीही निवडणूक लढवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. आरोपी भावेश भिंडेंने 2009 मध्ये मुलुंडमधून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्याच्या इगो नावाच्या कंपनीच्या माध्यमातून मोठ मोठे होर्डिंग्ज लावले जातात. याच भावेशवर विनापरवानगी साइन बोर्ड लावल्याचे 26 गुन्हे दाखल आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातच तसा उल्लेख आहे.
भावेश भिंडेवर एवढे गुन्हे असतानाही रेल्वे पोलिसांनी त्याला होर्डिंग्ज लावण्याची परवानगी कशी दिली.. त्याचं रेल्वे खात्यात कुणाशी साटंलोटं होतं का असा सवाल आता निर्माण होतोय... घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग हे मुंबईतलचं नाही तर आशियातलं सर्वात मोठं होर्डिंग असल्याची जाहीरातबाजी भावेश भिंडेंच्याच कंपनीने केली होती.