Electric AC Double Decker Bus : मुंबईत डबल डेकरने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना बेस्ट प्रशासनाने एक गारेगार गिफ्ट दिलं आहे. आजपासून सीएसएमटीहून सकाळी पावणे नऊला पहिली बस सुटली असून शनिवार, रविवार डबलडेकर बसमधून हेरिटेज टूर चालवण्यात येणार आहे. दरम्यान सध्या ही बस सीएसएमटी स्टेशन (CSMT Station) ते एनसीपीए (NCPA) या मार्गावर चालवली जाणार आहे. सकाळी 8.45 ते रात्री 10.30 या वेळेत ही बस धावणार आहे. या बससाठी रूट नंबर 115 असणार आहे. या एसी डबलडेकर बसचं (AC Double Decker Bus) भाडं देखील सामान्यांच्या आवाक्यातील आहे. पहिल्या 5 किमी साठी केवळ 6 रूपये आकारले जाणार आहेत. मुंबईच्या रस्त्यावर अशा 200 बस उतरवण्याचा मानस आहे.
पहिल्या टप्प्यात बेस्टच्या ताफ्यात 7 वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस आहेत. एकूण 65 आसनव्यवस्था असलेली ही डबल डेकर बस आहे. सध्या दोनच बस मुंबईकरांच्या सेवेत येणार असून पुढच्या आठवड्यापर्यंत आणखी 7 ते 8 बस सेवेत येतील. तसंच मार्चअखेर 200 एसी इलेक्ट्रीक डबलडेकर बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ होतील. या बसचं तिकिट सर्वसामान्यांना परवडेल असं आहे. या वातानुकुलित बसचं कमीतकमी तिकिट 6 रुपये आहे. स्मार्ट कार्ड च्या माध्यमातून देखील तिकीट काढता येणार आहे.
वाचा: लेकीचा पायगुण! आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
बेस्ट उपक्रमामध्ये सध्या 45 वातानुकूलित बस आहेत. यातून 54 ते 60 प्रवासी प्रवास करू शकतात. बेस्टमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या डबलडेकर बसची एकूण प्रवासी क्षमता 76 इतकी आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था, दोन्ही बाजूंना स्वयंचलित दरवाजे असून बसची 9 मीटर लांबी असल्याने बसच्या आतील भागात प्रशस्त अशी जागा. एका बसची किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे. 45 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 100 किमी धावण्याची क्षमता आहे. तर 80 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 250 किमी बस धावेल.