Mumbai Fashion street: चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकांच्या मधोमध असलेल्या फॅशन स्ट्रीटचे लवकरच रुपडं पालटणार आहे. नावाप्रमाणेच आता फॅशन स्ट्रीटही फॅशनेबल होणार आहे. मुंबईकरांचे खरेदीचे आवडते ठिकाण तर आहेच पण त्याचबरोबर बड्या अभिनेत्रीही कधी कधी येथे रेंगाळताना दिसतात. इतकंच नव्हे तर अनेक विदेशी पर्यटकांनाही फॅशन ट्रिट भुरळ घालतं. आता याच फॅशन स्ट्रीटचा कायापालट होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीच शिंदे सरकार एक महिन्याच्या आत भूमीपूजन करणार आहे. सरकारच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेनेही तयारी सुरू केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, एक महिन्यातच फॅशन स्ट्रीटचा लूक बदलणार आहे. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फॅशन स्ट्रीटची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. आझाद मैदान आणि क्रॉस मैदानातील गार्डन दिसतील अशा प्रकारे पुन्हा स्ट्रीटचं काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे आधुनिक सुविधा असलेले स्वच्छतागृह आणि फर्निचरची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे. सध्या फॅशन स्ट्रीटमध्ये अधिकृत 112 दुकाने आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जी दुकाने फुटपाथला लागून होती ती आता आमने-सामने असणार आहेत. तसंच, मध्ये थोडी जागा ठेवणार आहेत व तिथे बसायला बेंचदेखील ठेवण्यात येतील.
मुंबईतील फॅशन स्ट्रीटचा युरोपीय व सिंगापूरच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. यासंबंधी हेरिटेज विभागाला मंजुरीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यानंतर महापालिकेचे कमिश्नर भूषण गगराणी यांच्या मंजुरीनंतर कामाचे टेंडर जारी करण्यात येईल.
दक्षिण मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्हसह अन्य ठिकाणी फिरायला येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटक कपडे खरेदी करण्यासाठी फॅशन स्ट्रीटला येतात. सणा-सुदींच्या दिवसात येथे खूप जास्त गर्दी असते. गेल्या कित्येत दशकांपासून येथे एक फुटपाथ असून त्यावर 112 दुकाने आहेत. फॅशन स्ट्रीटवर दुकानांनी अर्धाअधिक फुटपाथ काबीज केला आहे. त्याचबरोबर, तासनतास खरेदी करुन तिथे विश्रांती घेण्यासाठी किंवा बसायला एकही बाकडा उपलब्ध नाही. त्यामुळं अनेकदा महिलांना त्रास होतो. त्यामुळं येथे बसण्यासाठी व्यवस्था आणि आधुनिक शौचालये बनवण्याची योजना आणख्यात आली आहे.
फॅशन स्ट्रीटचे नवे स्वरुप कसं असणार त्यात नेमके काय बदल करावे लागतील याचा अराखडा तयार करण्यात येत आहे. सध्या येथील फुटपाथची दुरावस्था आणि सुविधांचा अभाव यामुळं खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांचा हिरमोड होतो. तसंच, 2022मध्ये येथे आग लागली होती. त्यात 20 ते 22 दुकाने जळून खाक झाली होती. पुन्हा असे अपघात होऊ नये म्हणून खबरदारीही प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.