नवाब मलिक यांचे नवे ट्विट, देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

Mumbai drugs case : ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मलिक यांनी आज ट्विट करत फडणवीस यांना इशारा दिला आहे.  

Updated: Nov 10, 2021, 09:54 AM IST
नवाब मलिक यांचे नवे ट्विट, देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा title=

मुंबई : Mumbai drugs case : ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. या दोघांमधील नव्या वादाने अमली पदार्थ कारावाई प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा नवा आरोप करण्यात आला आहे. आधी मलिक यांनी आरोप केला. त्यानंतर काल फडणवीस यांनी जमीन खरेदीवरुन मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे मलिक यांनी एका तासात सांगितले. त्यानंतर मलिक यांनी आज ट्विट करत फडणवीस यांना इशारा दिला आहे. अंडरवर्ल्डशी संबंध माझे नाही तर तुमचे संबंध आहेत, असे मलिक यांनी म्हटले आहे. (Nawab Malik's new tweet, a warning to Devendra Fadnavis)

 नवाब मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध आहेत,  असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांनीही मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना हा आरोप केला आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतली, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, फडणवीस यांचे गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांचा बुधवारी हायड्रोजन स्फोट करणार आहे, असा इशारा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. दरम्यान नवाब मलिक यांनी ट्वीट केलं असून आज सकाळी  10 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे.

नवाब मलिक यांनी ट्वीट करत फडणवीस यांना इशारा दिला आहे. “उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है. मिलते है आज सुबह 10 बजे”, असे नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जमीन व्यवहाराबाबतचे केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. जमिनीचा जो काही व्यवहार केला आहे, त्याची सर्व कागदपत्रे उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध आहेत. जो काही व्यवहार झाला, त्याचे मुद्रांक शुल्क भरलेले आहे. फडणवीस खोटे बोलत आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. या जमीन प्रकरणी सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करा, मी कुठल्याही चौकशीला तयार आहे, असे मलिक म्हणाले. 

दरम्यान, सनातन या संस्थेने कोकणातील खेड जामगे येथील दाऊद इब्राहिम याचे घर विकत घेतले, मग सनातनचे आणि दाऊदचे संबंध आहेत, असे समजायचे का, असा सवाल त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी अंडरवर्ल्डशी आपले संबंध असल्याचा आरोप करून वेगळा खेळ सुरू केला आहे. परंतु गुन्हेगारी जगताच्या माध्यमातून मुंबई शहराला ‘ओलीस’ कसे ठेवले, एक व्यक्ती परदेशात बसून खंडणी कुणासाठी वसूल करत होती, तो अधिकारी कुणाचा खास होता, याचा पर्दाफाश आज करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे आता मलिक काय बोलणार याची उत्सुकत आहे.