भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांकडून सहकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; मुंबईतील घटना

Mumbai Crime News : मुंबईत सहकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय तटरक्षक दलाच्या दोन जवांनाना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा प्रकार घडल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आकाश नेटके | Updated: Mar 15, 2024, 02:53 PM IST
भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांकडून सहकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; मुंबईतील घटना title=

Mumbai Crime : मुंबईतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या दोन जवानांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपींनी सहकाऱ्याच्या मुलीसोबतच हे कृत्य केलं आहे. गेल्यावर्षी ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आलं आहे. मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत आईला माहिती दिल्यानंतर ही याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली.

भारतीय तटरक्षक दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना पवई येथे त्यांच्या सहकाऱ्याच्या 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली बुधवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 ऑक्टोबर 2023 रोजी दोन आरोपींपैकी एकाच्या पवईच्या घरात घडली होती. आईच्या तक्रारीनंतर तब्बल सहा महिन्यांनी याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बलात्काराची घटना घडली त्यादिवशी पीडित मुलगी तिच्या कोचिंग क्लासवरुन घरी परतली होती आणि एकटीच होती. पीडितेची आई, बहिण आणि भाऊ एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. तर मुलीचे वडील रात्रपाळीवर होते. त्याच परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय आरोपीने मुलीच्या घराचा दरवाजा वाजवला आणि माझ्या पत्नीने तुला काही कामासाठी घरी बोलवलं आहे असे सांगितले. दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत असल्याने अल्पवयीन मुलीने त्याच्यावर संशय घेतला नाही आणि त्याच्यासोबत गेली.

मुलगी जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचली तेव्हा आधीपासून घरात असलेल्या दुसऱ्या आरोपीने तिचं तोंड दाबून तिला बेडरुममध्ये ओढत नेले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर काही मिनिटांनी 30 वर्षीय आरोपीच्या पत्नीने त्याला फोन करुन सांगितले की ती त्यांच्या शेजारच्या मुलीच्या आईसोबत घरी येत आहे. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी मुलीला आणि तिच्या वडिलांना या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या घटनेनंतर आरोपी पीडित मुलगी तिच्या घरी एकटी असताना अनेकदा तिचा दरवाजा ठोठावत असे. त्याने इमारतीच्या लिफ्टमध्ये तिच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच या घटनेच्या दिवशी, 23 वर्षीय आरोपीने मुलीला त्याच्या स्कूटरवरून क्लासला सोडतो असे सांगितले होते मात्र तिने त्याला नकार दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे मुलगी इतकी दुखावली गेली की ती नैराश्यात गेली आणि तिच्यावर नौदल रुग्णालयात उपचार सुरू झाले. नोव्हेंबर 2023 मध्ये, तिची आई तिच्या पालकांच्या घरी गेली आणि जेव्हा ती डिसेंबर 2023 मध्ये परत आली, तेव्हा मुलीला तणाव सहन झाला नाही आणि ती तुटून पडली. मुलीने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने तिच्या पतीला याची माहिती दिली. त्यानंतर पतीनने भारतीय तटरक्षक दलाकडे अंतर्गत तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली. या दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376(डी)(ए), 506(2) आणि 34 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.