घरी परतणाऱ्या कुटुंबाला कारने उडवल्यानंतर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार

Chembur Accident : चेंबूरच्या गार्डनजवळ एका मद्यधुंद तरुणीने भरधाव कार चालवात स्कूटरवर असलेल्या एका कुटुंबाला उडवलं आहे. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 29, 2023, 08:25 AM IST
घरी परतणाऱ्या कुटुंबाला कारने उडवल्यानंतर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार title=

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : शनिवारी रात्री चेंबूरच्या (Chembur) डायमंड गार्डनजवळ (diamond garden) नशेत असलेल्या एका महिलेने तीन जणांना कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या सुमारास ही महिला नशेत भरधाव वेगाने मैत्री पार्कवरुन चेंबूरच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी समोर स्कूटीवर असलेल्या हर्ष जैस्वाल, समृद्धी जैस्वाल, दिपू जैस्वाल यांना तिने जोरदार धडक दिले. हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळ असलेल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर नशेत असलेल्या त्या तरुणीला चेंबूर पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. नशेत असलेल्या महिलेवर स्थानिक नागरिकांनी राग व्यक्त करत तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. या घटनेचा पुढील तपास चेंबूर पोलीस ठाणे करीत आहे.

शनिवारी रात्री 11.15 च्या सुमारास मुंबईतील चेंबूर येथील डायमंड गार्डन जवळ एका भरधाव कारने समोर उभ्या असलेल्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवर बसलेले पिता-पुत्र आणि मुलगी गंभीर जखमी झाले. पीडित कुटुंब वाढदिवस साजरा करून आपल्या घराकडे जात होते. डायमंड गार्डनच्या सिग्नलवर त्यांची स्कूटर थांबली असता समोरून आलेल्या तरुणीच्या कारने तिघांना जोरदार धडक दिली. या अपघातत तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींना जवळच्या जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित कुटुंबियांच्या ही तरुणी नशेत होती आणि शिवीगाळ करत होती. पोलीस ठाण्यात गेल्यावरही तरुणीने मोठा गोंधळ घातला. वैद्यकीय चाचणीसाठी जात असताना पीडितांच्या कुटुंबियांचा राग अनावर झाला आणि तरुणीला चोप देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत तरुणीला बाजूला केलं. या संपूर्ण प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी महिलेला अटक केली असून भारतीय दंड संहितेच्या कलम 337,338,504 आणि मोटार वाहन कायद्याच्या 184,185 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

"आम्ही वाढदिवसाच्या पार्टीतून घरी जात असताना डायमंड सिग्नलवर उभा होतो. सिग्लवर गाडी थांबली होती. ती तरुणी समोरून आली आणि तिच्या कारने स्कूटरला धडक दिली. त्यामुळे माझ्या मुलाच्या डोक्याला दुखापत झाली आणि माझ्या मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला. नवराही जखमी आहे, पोलिसांनी कोणतीही मदत केली नाही. महिला दारूच्या नशेत आहे, महिलेने माझ्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. माझ्या हातात एक लहान मूल होते, त्यामुळे मी काहीही करू शकले नाही," असे पीडित महिलेने सांगितले.