Mumbai Crime : मद्यधुंद तरुणाने जॉगिंगसाठी गेलेल्या महिलेला उडवले; धावपटूचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : दादर येथील महिला जॉगिंगसाठी पहाटे बाहेर पडली होती. मात्र भरधाव कारचालक तरुणाने तिला उडवले. महिलेला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

Updated: Mar 19, 2023, 11:45 AM IST
Mumbai Crime : मद्यधुंद तरुणाने जॉगिंगसाठी गेलेल्या महिलेला उडवले; धावपटूचा दुर्दैवी मृत्यू title=

Crime News :  मुंबईतील (Mumbai Crime) वरळी येथे मद्यधुंद कारचालकाने एका महिला धावपटूचा बळी घेतला आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या या महिला धावपटूला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मॉर्निंग वॉक करताना सकाळी साडे सहाच्या सुमारास वरळी डेरीच्या उत्तर वाहिनीवर हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका 23 वर्षीय सुमेर मर्चंट याला ताब्यात घेतले आहे.

वरळी सीफेसवर भरधाव कारने धडक दिल्याने जॉगिंगसाठी निघालेल्या दादर येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. राजलक्ष्मी राज कृष्णन (38) असे या महिलेचे नाव असल्याचे समोर आले आहे. राजलक्ष्मी या वरळी डेअरीजवळ जॉगिंग करत होत्या. पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर राजलक्ष्मी यांना तात्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.

राजलक्ष्मी यांना धडक दिल्यानंतर कार चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात कार चालकाला किरकोळ दुखापत झाली होती. अपघातानंतर कारचालक सुमेर मर्चंटने तिथून पळ काढला होता. मात्र तपास करत पोलिसांनी त्याला शोधून काढले. वैद्यकीय चाचणीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दारू पिऊन चुकीच्या लेनने गाडी चालवल्यामुळे भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका 3.5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. विश्वास अट्टावर नावाच्या व्यक्तीने दुसर्‍या कारला धडक दिल्याने बालकाचा मृत्यू झाला आणि इतर दोघे जखमी झाले होते. संध्याकाळी हा अपघात झाला तेव्हा ही चिमुकली तिचे काका आणि चालकासोबत गाडीत होती. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमी झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी पोलिस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या ट्रॅफिक सिग्नलजवळ अट्टावरने आधी ऑटोरिक्षाला, नंतर एका टेम्पोला आणि पादचाऱ्यालाही धडक दिली होती. यानंतर घटनास्थळावरून त्याला अटक करण्यात आली होती. यानंतर अट्टावर यांच्यावर खुनाचा गुन्हा  आणि आयपीसी आणि मोटार वाहन कायद्याच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र लगेचच कारचालकाला जामीन मिळाला होता.