तन्वीरने यश नाव सांगून फसवलं, मुंबईतल्या मॉडेलचा 'लव्ह जिहाद'चा आरोप...

मुंबईतल्या एका मॉडेलने रांचीतल्या एका तरुणावर ब्लॅकमेल करुन लग्न आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. तरुणाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

राजीव कासले | Updated: May 31, 2023, 06:28 PM IST
तन्वीरने यश नाव सांगून फसवलं, मुंबईतल्या मॉडेलचा 'लव्ह जिहाद'चा आरोप...  title=

Crime News : झारखंडची राजधानी रांचीतल्या (Ranchi) यश मॉडलिंग कंपनीच्या (Yash Modeling Company) मालकावर लव्ह जिहादचा (Love Jihad) आरोप करण्यात आला आहे. या मॉडलिंग कंपनीत प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका तरुणीने हा आरोप केला आहे. बिहारमध्ये राहाणारी मानवी राजला (Manvi Raj) मॉडलिंग (Modelling) क्षेत्रात कारकिर्द करायची होती. यासाठी तीने रांचीतल्या यश मॉडलिंग कंपनीत प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण या कंपनीच्या मालकाला मानवी आवडली. दोघांमध्ये मैत्री झाली. 

'यश' नाही तर 'तन्वीर'
पण मालकाच्या मनात काहीतरी वेगळंच सुरु होतं. त्याला मानवीशी लग्न करायचं होतं. यासाठी त्याने मानवीला लग्नाची मागणी घातली. पण मानवीने त्याची मागणी फेटाळून लावली. इतकंच नाही तर त्याने खोटं सांगून मैत्री केल्याचंही मानवीला समजलं. त्याने मानवीला आपलं नाव यश असल्याचं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात त्याचं नाव तनवीर अख्तर खान असं होतं. मानवीने त्याच्याशी मैत्री तोडून टाकली. ही गोष्ट तनवीरला खटकली आणि त्याने मानवीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

मानवीवर लग्नासाठी दबाव
मानवीचे काही पर्सनल फोटो तनवीरकडे होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तनवीरने मानवीच्या मागे लग्नाचा तगादा लावला. इतकंच नाही तर धर्म परिवर्तन करण्यासाठीही त्याने मानवीवर दबाव टाकण्यासही सुरुवात केली. या सर्व गोष्टीला वैतागून मानवीने रांची शहर सोडलं आणि ती मुंबईत स्थायिक झाली. पण एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या तनवीरने तिचा पाठलाग सुरु ठेवला. सातत्याने तो तिला धमक्या देत होता. अखेर या सर्व गोष्टींना वैतागून मानवीने मुंबईतल्या वर्सोवा पोलीस स्थानकात तनवीरविरुद्ध तक्रार दाखल केली.

आक्षेपार्ह फोटो काढले
होळीच्या दिवशी तन्वीरने गुंगीच्या गोळ्या देऊन आक्षेपार्ह फोटो काढल्याचा आरोप मानवी राजने केला आहे. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तन्वीर मानवीला ब्लॅकमेल करत होता. याप्रकरणी मानवीने ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सुरक्षेची विनंती केली आहे. पोलीसही याप्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. मुंबईतून हे प्रकरण रांची पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आलं आहे. 

तन्वीरने फेटाळले आरोप
मानवी राजने केलेले सर्व आरोप तन्वीरने फेटाळले आहे. उलट तन्वीरनेच मानवीवर ब्लॅकमेलिंगचे आरोप केलेत. मानवी आपल्याकडे काम करत होती, पण तिच्यामुळे आपल्याला मोठा तोटा झाला. याचे पैसे आपण तिच्याकडे मागितले. त्यामुळे ती मला खोट्या प्रकरणात अडकवत असल्याचं तन्वीरने म्हटलंय. तसंच आपले काही प्रायव्हेट फोटो तिच्याकडे असून ते फोटो आपल्या ओळखीच्या लोकांना पाठवल्याचंही तन्वीरने म्हटलंय. मानवीचा बॉयफ्रेंड रवजोत सिंह आणि त्याचा मित्रा आपल्या मोबाईलमधून डाटा चोरत असल्याचा आरोपही तन्वीरने केलाय.