7 वर्षांच्या करावासानंतर 5 जणांची मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, वाचा काय आहे प्रकरण 

मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला

Updated: Aug 15, 2022, 09:23 PM IST
7 वर्षांच्या करावासानंतर 5 जणांची मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, वाचा काय आहे प्रकरण  title=
प्रतिकात्मक फोटो

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : ब्लॅकमेक करत पैसे उकळण्यासाठी प्राणघातक हल्ल्या प्रकरणात सात वर्षांपासून तुरुंगात असलेल्या पाच जणांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला आहे. 

2012 मध्ये पैसे  उकळण्यासाठी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. केस सुरू असताना एका आरोपीचा मृत्यू झाला, तर दुसरा कल्याण कारागृहात आहे. फिर्यादी पक्ष संशयापलीकडे आरोप सिद्ध करू शकला नसल्यामुळे सर्व आरोपी निर्दोष सुटले. 

कलम 397 (दरोडा किंवा डकैती दरम्यान प्राणघातक शस्त्राचा वापर), 506(2) (गुन्हेगारी धमकावणे) आणि 341 (चुकीचा संयम) कलम 34 (सामान्य हेतूने) नुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण कोर्टने आरोपींना सात वर्षे सश्रम कारावास आणि 2,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. 

3 फेब्रुवारी 2012 रोजी उल्हासनगरमधील सह्याद्री नगर इथं 700 रुपये चोरण्यासाठी एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पीडित एक संगणक संस्था शिक्षक होते. त्याचं एका महिलेवर प्रेम जडलं होतं. दोन आरोपींनी शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाबाबत सर्वांना सांगण्याची धमकी देत ​​घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांची मागणी केली आणि त्या शिक्षकाने ते पैसे दिले. आरोपींनी नंतर पुन्हा पैशांची मागणी केली मात्र शिक्षकाने नकार दिला.

त्यामुळे 2 फेब्रुवारी रोजी सर्व आरोपींनी पैसे न दिल्याने त्याला शिवीगाळ केली.  नंतर त्या शिक्षकाला मारहाण केली आणि 10,000 रुपयांची मागणी केली. परंतु त्या शिक्षकाकडे पैसे नव्हते. तेव्हा एका आरोपीने शिक्षकाच्या दुचाकीतून पेट्रोल काढून त्याच्यावर ओतंले.  दुसऱ्या एका आरोपीने माचिसची काडी पेटवली, जी दुसऱ्याने विझवली. दरम्यान, आणखी एका आरोपीने शिक्षकाला चाकू आणि तुटलेल्या बाटलीचा धाक दाखवला.

पाच आरोपींचे वकील ऍड. वकील आशिष सातपुते यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींकडे लक्ष वेधले. पीडितेच्या वैद्यकीय अहवालात त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे ऍड.सातपुते यांनी सांगितलं.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी  'आरोपींविरुद्धची केस संशयापलीकडे सिद्ध करण्यासाठी पुरावे अपुरे आहेत आणि त्यामुळे या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटण्यास पात्र आहेत' असा निकाल दिला.