Sajjan Jindal : देशातील प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार जिंदाल यांच्याविरोधात मुंबईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा एफआयआर 13 डिसेंबर रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.
सज्जन जिंदाल यांच्यावर एका 30 वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादवि 376 (बलात्कार), कलम 354 आणि कलम 503 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, जानेवारी 2022 मध्ये उद्योगपती सज्जन जिंदालकार्यालयात ही घटना घडली होती. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिंदाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता बीकेसी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
तक्रारीत पीडित महिलेने सांगितले आहे की, 2021 मध्ये ती तिच्या भावासोबत परदेशात एका व्हीआयपी बॉक्समध्ये क्रिकेट मॅच पाहत होती. त्यादरम्यान तिची आणि सज्जन जिंदाल यांची भेट झाली. जिंदाल यांनी मुंबईतील बीकेसी येथील जेएसडब्ल्यूच्या कार्यालयाचे पेंटहाऊस दाखविण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. हा बलात्कार 24 जानेवारी 2022 रोजी झाला होता. या संदर्भात महिलेने फेब्रुवारी महिन्यात बीकेसी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली होती, पण पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. त्यामुळे पीडित महिलेला उच्च न्यायालयात जावे लागले. महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने बीकेसी पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
Mumbai Police have registered an FIR against Chairman and MD of JSW Group Sajjan Jindal in BKC police station under IPC sections 376 (rape),354 and 506 on a complaint filed by a 30-year-old woman.
— ANI (@ANI) December 17, 2023
परदेशात भेट झाल्यानंतर व्यवसायासंदर्भात पीडित महिला आणि सज्जन जिंदाल मुंबईतही भेटू लागले. पीडितेच्या आरोंपानुसार, जिंदालने आपल्या मेसेजमध्ये तिच्यासाठी बेबी आणि बेब असे शब्द वापरण्यास सुरुवात केली. तसेच तिला हॉटेलमध्ये भेटण्याची विनंती करू लागला. सज्जन जिंदालच्या सांगण्यावरून पीडितेने 24 डिसेंबर 2021 रोजी हॉटेल ताज लँड्स एंड येथे एक सूट बुक केला, जिथे ते दोघे भेटले. सज्जन जिंदालने महिलेला सांगितले की, त्याचे त्याच्या पत्नीसोबत चांगले संबंध नाहीत. पण समाज आणि मुलांकडे बघून मी पती-पत्नीचे नाते पुढे नेत आहेत. यानंतर दोघांमध्ये व्यावसायिक संभाषण झाले आणि जिंदाल यांनी महिलेला तिच्या भावाला त्यांच्यासोबत संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर जिंदालने मेसेजमध्ये मला तिच्यामध्ये खूप रस असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आणि किस इमोजी पाठवण्यास सुरुवात केली. हळुहळू जिंदालने लग्नाच्या बहाण्याने पीडितेशी जवळीक साधली आणि नंतर बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर पीडितेने फेब्रुवारी महिन्यात बीकेसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. तक्रार नोंदवूनही पोलिसांनी गुन्हा केला नाही. यानंतर पीडितेने न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून न्यायालयाने पोलिसांना तातडीने एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, पीडित महिलेने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, तिला सज्जन जिंदालकडूनही धमक्या येत होत्या. याशिवाय तक्रार मागे घेण्यासाठी पैसेही देण्याचे आमिष दिले होते.