अंथरुणाला खिळून पडलेल्या पतीसमोरच पत्नीची हत्या अन् नंतर....; रिक्षाचालकाचे हादरवणारं कृत्य

Mumbai Crime : एका व्यक्तीने लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे. त्यानंतर आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 19, 2024, 12:27 PM IST
अंथरुणाला खिळून पडलेल्या पतीसमोरच पत्नीची हत्या अन् नंतर....; रिक्षाचालकाचे हादरवणारं कृत्य title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Mumbai Crime : मुंबईत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने विवाहित प्रेयसीची हत्या केली आहे. आरोपीने त्यानंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचा जीव वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हत्या झालेली महिला मुलांसह पुण्याहून मुंबईत प्रियसोबत राहण्यासाठी आली होती. मात्र आरोपीने रागाच्या भरात तिची हत्या केली.

कांदिवली पूर्वमध्ये एका 29 वर्षीय महिलेची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आरोपी बाबुराव मोरे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर मैनाबाई गिरी असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. महिलेने बाबुराव मोरेच्या गैरहजेरीत तिच्या आजारी पतीला पुण्याहून मुंबईत राहायला आणलं होतं. त्यामुळे आरोपी बाबुराव मोरे संतापला होता. रागाच्या भरात त्याने मैनाबाईची हत्या केली. त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला.

मैनाबाई गिरी 40 वर्षीय बाबुराव मोरे याच्यावर विश्वास ठेवून पुण्यातून पळून तीन वर्षांपूर्वी मुंबईत आल्या होत्या. आता त्याच प्रियकराने मैनाबाई गिरींची हत्या केली. कुरार पोलीस ठाण्यांतर्गत पंचशील चाळीत हा सगळा प्रकार घडला. कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी मैनाबाई गिरीचा गळा चिरून खून केल्यानंतर आरोपी बाबुराव मोरे याने स्वत:ला आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर जखमी मोरेला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपी बाबुराव मोरे बोलण्याच्या स्थितीत नसल्याने  त्याचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. कुरार पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैनाबाई गिरी पुण्यात उदरनिर्वाहासाठी ऑटो रिक्षा चालवत असे. यादरम्यान त्यांची मोरे यांच्याशी मैत्री झाली. मोरे हा देखील रिक्षा चालवायचा. गिरी यांचा पती दारू पिऊन त्यांना मारहाण करायचा. त्यामुळे पतीच्या जाचापासून सुटका करुन घेण्यासाठी गिरी यांनी मुंबईत येऊन मोरे याच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये, गिरी त्यांच्या दोन मुलांसह पळून बाबुराव मोरे याच्याकडे राहायला आल्या. चार दिवसांपूर्वी गिरींचे मोरे याच्याशी काही कारणावरून भांडण झाले. त्यावेळी मोरेने धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला केला. त्यानंतर मोरेने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला.

गिरी गेल्या तीन महिन्यांपासून कांदिवली पूर्व येथील शांतीनगर येथे भाड्याने राहत होता. पुण्यात राहणाऱ्या पतीपासून त्या वेगळ्या झाल्या होत्या. मोरे आपल्या गावी गेला असताना गिरी यांना पती आजारी असल्याचे कळले. त्यांनी त्याला मुंबईला त्यांच्या घरी आणले. मोरे परत आल्यानंतर गिरी यांचा पती घरात दिसल्याने त्याला राग आला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. गुरुवारी मोरेने चाकू आणून मैनाबाई गिरींवर वार केले. ही घटना घडली तेव्हा गिरी यांचा पती जवळच होता. पण आजारी असल्याने तो पत्नीच्या मदत करु शकला नाही.