तब्बल 600 मुलींना पाठवले अश्लील फोटो आणि व्हिडिओ, असा मिळवायचा मुलींचे मोबाईल नंबर

मुली आणि महिलांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून करायचा 'ही' मागणी

Updated: Jul 22, 2022, 06:18 PM IST
तब्बल 600 मुलींना पाठवले अश्लील फोटो आणि व्हिडिओ, असा मिळवायचा मुलींचे मोबाईल नंबर title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबई पोलिसांनी एका विकृत तरुणाला अंधेरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा तरुण मुली आणि महिलांचे नंबर मिळवून त्यांना अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवत होता. एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन अखेर या तरुणाचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईतल्या सायन इथल्या धारावी परिसरात रहाणारा रवी दांडू हा तरुण एका खासगी कंपनती डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करतो. मुली आणि महिलांचे मोबाईल नंबर तो हॅक करायचा. त्यानंतर त्यांचे फोटो मिळवून ते अश्लील फोटोंसोबत मॉर्फ करायचा. हे फोटो आणि व्हिडिओ संबंधीत मुलींना पाठवून आपल्याशी शारीरिक संबंध ठेव अन्यथा फोटो आणि व्हिडिओ पाठवून बदनामी करेन अशी धमकी तो देत होता. 

असा झाला आरोपीचा पर्दाफाश
आरोपी रवी दांडू विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक मिळवायचा. विलेपार्ले इथं राहाणाऱ्या एका कॉलेज विद्यार्थिनीचा त्याने मोबाईल नंबर मिळवला. त्या मुलीला त्याने फोन करत आपण तुझ्याच कॉलेजमध्ये शिकत असून अभ्यासाची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला असून त्या ग्रुपमध्ये विद्यार्थिनीला सामील होण्यास सांगितलं. मुलीनेही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होण्यास सहमती दर्शवली.

ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी आरोपी रवीने या विद्यार्थिनीला एक लिंक पाठवत ओटीपी मागितला. त्या विद्यार्थिनीनेही विश्वास ठेवत त्याल ओटीपी पाठवला. या संधीचा फायदा उचलत आरोपी रवीने तिचा मोबाईल हॅक केला. यानंतर तिचे फोटो मॉर्फ करत त्याने विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

आरोपीने विद्यार्थिनीला एकांतात भेटण्यासाठी बोलावलं. पण मुलीने हिंमत दाखवत आरोपीची पोलिसात तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिासंनी आरोपी रवी दांडू याला धारावीमधून अटक केली. आरोपीने अशाप्रकारे 600 पेक्षा जास्त मुली आणि महिलांचे मोबाईल नंबर हॅक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.