शाब्बास मुंबईकरांनो.... जुलैमध्ये सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात

जुलैमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का ४८.५६ टक्के एवढा आहे. 

Updated: Aug 2, 2020, 09:08 AM IST
शाब्बास मुंबईकरांनो.... जुलैमध्ये सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात title=

मुंबई: देशातील आणि राज्यातील कोरोनाचा Coronavirus हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील परिस्थितीमध्ये आता लक्षणीय सुधारणा झाली आहे. कारण, जुलै महिन्यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर शहरातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतही आता केवळ ७२ एक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. धारावीत आतापर्यंत २५६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २२३५ रुग्ण करोनावर मात देऊन घरी गेले आहेत
काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मनपा क्षेत्रातील कोरोनाची साथ आटोक्यात आल्याचा दावा केला होता. 

१ जुलै रोजी मुंबईत ७८ हजार ७०८ कोरोना रुग्ण होते. यापैकी ४४७९१रुग्ण बरे झाले आहेत. तर जुलैमध्ये २९ हजार २८८ एक्टिव्ह रुग्ण होते. ३१ जुलैपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार २७८ झाली. तर कोरोनाने बरे होणाऱ्यांची संख्या ८७०७४ पोहोचली होती. त्यामुळे जुलैमध्ये एकूण ४२२८३ रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे जुलैमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का ४८.५६ टक्के एवढा आहे. तर डबलिंग रेट ४२ दिवसांवरून ७७ दिवस झाला आहे. गेल्या काही दिवसांत धारावीसह मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण १८ म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये रुग्णवाढीचा सरासरी वेग १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे.

मुंबईतली एक्टिव्ह रुग्णांची संख्या ही सध्या २०,७३१ एवढी आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत १,१५,३३१ जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी ८७,९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण ६,३९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.