Mumbai Coastal Road Traffic Guidelines : मुंबईतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तसेच महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या म्हणजेच सोमवारी 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले जाणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी सुरु केला जाणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे. पण आता या कोस्टल रोडवरुन कोणकोणत्या वाहनांना प्रवेश दिला जाणार, याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची म्हणजेच कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका उद्यापासून खुली होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही मार्गिका खुली केली जाणार आहे. वरळी सी फेस परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौक, खान अब्दुल गफार खान मार्ग या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोस्टल रोडवर वेग मर्यादा काय असेल, तिथे कोणकोणत्या वाहनांना प्रवेश दिला जाईल, याबद्दलची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालं असून त्याचं उद्घाटन उद्या केलं जाणार आहे. या कोस्टल रोडची एकूण लांबी 10.58 किलोमीटर असून त्यापैकी 9 किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईत आहे. त्यात 2.7 किमीच्या बोगद्याचाही समावेश आहे. समुद्राखालून जाणाऱ्या या बोगद्यातून किमान दोन-तीन मिनिटांचा प्रवास करता येणार आहे. कोस्टल रोडचे उद्घाटन 11 मार्चला होणार असेल तरी मुंबईकरांना मंगळवारी 12 मार्चपासून सर्व वाहनांसाठी खुला होणार आहे.
वरळी ते मरीन ड्राइव्ह ही मार्गिका आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत वाहतुकीसाठी सुरु असेल. तर शनिवार आणि रविवारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेची कामे शिल्लक असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर वाहने थांबवून वाहनांतून खाली उतरण्यास तसेच फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जर कोणताही वाहनचालक असे करताना आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
कोस्टल रोडच्या या मार्गावर ठराविक वेगमर्यादाही असणार आहेत. प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत मार्गावरील सरळ रोडवर ताशी 80 किमी वेगमर्यादा असेल. तर 2.7 किमीच्या बोगदा असलेल्या ठिकाणी ताशी 60 किमी वेगमर्यादा असणार आहे. तसेच या कोस्टल रोडमधील प्रवेश/निर्गमन असलेल्या ठिकाणी ताशी 40 किमी वेगमर्यादा ठेवावी लागणार आहे.
किनारी रस्ता हा केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे तर पर्यावरणदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण वाहतूक कोंडी कमी होवून सुरक्षित प्रवासाचा वेग वाढेल. यातून वेळेची अंदाजे 70 टक्के बचत होईल. इंधनाची 34 टक्के बचत होईल, पर्यायाने विदेशी चलनाचीही मोठी बचत तर होईलच, त्यासोबतच वायू प्रदूषणात घट होईल.
सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड मालाची वाहने आणि मालवाहतूक करणारी वाहने (वगळून - बेस्ट आणि एसटी बसेस किंवा खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने) यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यासोबतच सर्व प्रकारच्या दुचाकी, सायकल आणि अपंग व्यक्तींसाठीच्या मोटर सायकल आणि स्कूटर (साइड कारसह), तीन चाकी वाहने, टांगा, हातगाडी यांसारखी वाहने यांना प्रवेशबंदी असेल. यासोबतच पादचाऱ्यांनाही कोस्टल रोडवर प्रवेश दिला जाणार नाही.