मुंबई सेंट्रल स्थानकाला 'या' व्यक्तीचे नाव द्या; शिवसेनेची मागणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही इच्छा होती.

Updated: Jul 11, 2019, 08:32 PM IST
मुंबई सेंट्रल स्थानकाला 'या' व्यक्तीचे नाव द्या; शिवसेनेची मागणी title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: पश्चिम रेल्वेमार्गावरील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे, अशी मागणी गुरुवारी शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत केली. आशिया खंडातील पाहिली रेल्वे म्हणजेच मुंबई ते ठाणे ही प्रवासी रेल्वे सुरू करण्यात मुंबईतील नाना शंकरशेट यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला 'नाना शंकरशेट रेल्वे स्थानक' असे नाव द्यावे, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे या मागणीचा सकारात्मक विचार करून मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर करावे, असा प्रस्ताव शिवसेनेच्या खासदारांनी मांडला.

दरम्यान, आज लोकसभेत दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही एलिव्हेटेड कॉरीडॉर करावा, अशी मागणी केली. एमयूटीपी- 3 ए च्या माध्यमातून हार्बर रेल्वे मार्गावर होणाऱ्या एलिव्हेटेड कॉरीडॉर मुळे हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि चर्चगेट स्थानक ते विरार या मार्गावरही एलिव्हेटेड कॉरीडॉर करावा, असा प्रस्ताव राहुल शेवाळे यांनी मांडला. 

खासदार शेवाळे यांनी केलेल्या विशेष मागण्या
- महिला प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेमध्ये टॉयलेटची व्यवस्था करावी.
- गर्भवती महिलांना अपंगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी द्यावी.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कपार्टमेंट ची सुविधा प्रत्येक ट्रेनमध्ये करावी.
- फ्री वायफाय प्रमाणेच प्रत्येक फलाटावर फ्री टॉयलेट करावे.
- लोकल गाड्यांचा विलंब टाळण्यासाठी आवश्यक तिथे रेल्वे ओलांडण्यासाठी फाटक लावले जावे.
- प्रवाशांची गर्दी, फेरीवाल्यांचा विळखा, वाहतूक कोंडी या आणि अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी विचाराधीन असलेल्या दादर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाला सुरुवात करावी.
- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. त्याजागी त्वरित अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
- रेल्वे फलाटांच्या उंचीबाबत नव्याने अभ्यास करून आवश्यक त्याठिकाणी फलाटांची उंची वाढवावी.