मुंबई : मुंबईची लाइफलाइन असलेल्या 'बेस्ट'ने बुधवारपासून दोन मार्गांवर कंडक्टरशिवाय बस सेवा सुरु केली आहे. अशाप्रकारे कंडक्टरशिवाय बस सेवा पहिल्यांदाच सुरु करण्यात आली आहे. ज्या ठिकाणाहून बस सेवा सुरु होईल, त्याठिकाणाहूनच प्रवाशांना टिकीट काढावं लागेल. या कंडक्टररहित बस मधल्या कोणत्याही स्टॉपवर थांबणार नसल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
बेस्टच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या बस दक्षिण मुंबईच्या दोन मार्गांवर धावणार आहेत. एक मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत असेल. तर दुसरा मार्ग चर्चगेट ते नरिमन पॉइंटपर्यंत असणार आहे. या बस सकाळच्या वेळेत असतील. इतर बसप्रमाणे या बस शेवटच्या स्टॉपशिवाय इतर कोणत्याही स्टॉपवर थांबणार नाहीत. कंटक्टर बस सुरु होण्याआधीच टिकीट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बेस्टचे उप जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी, बस इतर कोणत्याही स्थानकांत थांबणार नसल्याने प्रवासातील वेळ वाचणार असल्याचं ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी बेस्ट कमिटीने तिकीटांच्या किंमतीत कपात केली होती. बसचं तिकीट ८ रुपयांचं तिकीट कमी करुन ते ५ रुपये करण्यात आलं होतं.