Holi 2020 : यंदा दहन थैमान घालणाऱ्या 'कोरोना'सुराचं

या जीवघेण्या व्हायरसमुळे सगळीकडे भीतीचं वातावरण 

Updated: Mar 9, 2020, 08:47 PM IST
Holi 2020 : यंदा दहन थैमान घालणाऱ्या 'कोरोना'सुराचं  title=
Holi 2020 : यंदा दहन थैमान घालणाऱ्या 'कोरोना'सुराचं

रुचा वझे, झी मीडिया, मुंबई : संपूर्ण जगभरात गेल्या काही दिवसांपासून Corona कोरोना व्हायरसने कहर केला आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच धर्तीवर कोरोनापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईत अनोखं पाऊल उचलण्यात आलं आहे. 

देसभरात कोरोनाविषयीची भीती पाहता होळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले. अनेकांनी तर, या व्हारयसच्या संसर्गाचा धसकाच घेतला आहे. हे संपूर्ण वातावरण पाहता मुंबईत असणाऱ्या बीडीडी चाळीत 'कोरोना'सुराचा वध करण्यात येणार आहे. यासाठी बीडीडी चाळीतील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येत तब्बल ५५ फुटांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. 

उत्सवाचा उत्साह जपत आणि सामाजिक भान लक्षात घेत या मंडळींनी उचललेलं हे पाऊल अनेकांची दाद मिळवून जात आहे. शिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा मुंबईील होळीच्या सणाच्या निमित्ताने आकर्षणाचा विषय ठरत आहे. कोरोनाचं वाढतं थैमान पाहता येथील रहिवासी यंदा 'कोरोना'सुराचं दहन करणार आहेत. 

दरम्यान, सण-उत्सवांच्या या वातावरणावरही कोरोनाचीच दहशत पाहायला मिळत आहे. सुक्या आणि पर्यावरण पूरक रंगांनीच होळी खेळण्याचं आवाहन प्रशासन आणि काही स्वयंसेवी संस्थांनी केलं आहे. तर, नागरिकही त्यांच्या परिने या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करताना दिसत आहेत.